मुंबई - अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये बेळगाव वरून सीमावादाचा प्रश्न कळीचा मुद्दा बनून राहिला आहे. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यरत असून ती सतत कर्नाटक सरकारवर दबाव टाकत असते. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर वसलेल्या बेळगावात मराठी लोकांची वस्ती जास्त असल्यामुळे तो महाराष्ट्रात विलीन करावा म्हणून महाराष्ट्रानं दिल्लीत तगादा लावलेला असला तरी कर्नाटक सरकार त्याला हिरीरीने विरोध करत आलं आहे. बेळगाव सीमावाद हा अनेक दशकांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. मराठी भाषिक लोकसंख्येचे लक्षणीय प्रमाण असलेल्या बेळगाव शहरावर हक्क सांगण्याच्या संघर्षात राजकीय आणि सामाजिक तणाव निर्माण होत आलं आहेत. हाच धागा पकडून लेखक व दिग्दर्शक हर्षद नलावडे हे 'फॉलोअर 'नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर तीन मित्रांच्या जीवनाची वेधक गोष्ट या चित्रपटातून उलगडली जाणार आहे.
'फॉलोअर' या चित्रपटाने जगभरातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव गाजवलं असून नुकत्याच रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात याचा वर्ल्ड प्रीमियर संपन्न झाला. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले होते आणि मराठी, कन्नड आणि हिंदी या तीन भाषांचा संगम असलेला हा सिनेमा महाराष्ट्रासह बेळगाव व बंगलोरमध्येही एकाच वेळी झळकणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स आणि कॉजॅलिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. या निर्मितीसंस्थांव्यतिरिक्त विनय मिश्रा, प्रीती अली, प्रतीक मोइत्रो, अनुभव केआर, पल्लवी रोहतगी, मौलिक शर्मा, चारुलता मैत्र आणि हर्षद नलावडे हे निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच राघवन भारद्वाज, चरण सुवर्णा आणि अभिषेक गौतम हे सहनिर्माते म्हणून जोडलं गेलं आहेत.
फॉलोअर या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हर्षद नलावडे यांनी केलं असून, तेच मुख्य भूमिकेतही दिसणार आहेत. त्यांच्या सोबत रघु बसरीमारद, डोना मुन्शी आणि अन्य प्रतिभावान कलाकार यात झळकणार आहेत. साकेत ग्यानी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे, तर संकलन मौलिक शर्मा यांचे आहे. सम्यक सिंग यांनी या चित्रपटाची गीते लिहिली असून, त्यांना अभिज्ञान अरोरा यांच्या संगीताची साथ लाभली आहे.
बेळगाव सीमा वादावर प्रकाश टाकणारा तसेच मराठी, कन्नड आणि हिंदी भाषेचे मिश्रण असलेला चित्रपट, “फॉलोअर” येत्या २१ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -