नागपूर - नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे नवीन चित्रपट नगरी तयार करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. राज्याचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने रामटेकात नवी चित्रपट सृष्टी तयार करण्याचा प्रस्ताव पुढं करण्यात आला होता. आज त्यांच्या प्रस्तावावर नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये संस्कृती मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री आशिष जैस्वाल हे उपस्थित होते.
या बैठकीत रामटेक जवळील १२८ एकर जागा फिल्म सिटीसाठी निश्चित करण्यात आली आहे. विदर्भातही चित्रपट निर्मितीला चालना मिळावी यासाठी चित्रपट नगरी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. रामटेक जवळील १२८ एकर जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव हा आगामी पंधरा दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल. नागपूर जिल्ह्यातील फिल्मसिटी यशस्वी व्हावी यासाठी, एक कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.
रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर उभारणार फिल्मसिटी - आशिष जैस्वाल
विदर्भाच्या प्रगतीसाठी जे जे उपक्रम आवश्यक आहे, त्यासाठी सातत्यानं घेण्याचा प्रयत्न आम्कही रत आहोत. विदर्भातील कलावंतांना मुंबईत जाऊन संघर्ष करावा लागतोय. मध्य भारतात चित्रपट नागरी व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते, यासाठी रामटेक येथील जागा देखील निवडण्यात आली आहे. त्याचा जीआर देखील निघाला आहे.रामटेक मध्ये चित्रपटसृष्टी निर्माण होत आहे. जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटी ज्यांनी तयार केली त्यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली असल्याचं आशीष जैस्वाल म्हणाले आहेत.
फिल्मसिटी निर्माण करण्यामागची संकल्पना - चित्रपटाच्या निर्मितीसाठी आवश्यक सर्व प्रकारचे लोकेशन्स, शूटिंग स्टुडिओ, विद्युत उपकरणं, उच्च दाबाची जनरेटर्स, कॅमेरा, लेन्सेस, ट्रॅक, ट्रॉलीज, कपडेपट, मेकअप व्यवस्था, प्रीव्य्ह्यू थिएटर्स, संकलन स्टुडिओ, ग्राफीक्स तंत्र अशा अनेक गोष्टींची उभारणी या प्रकल्पांतर्गत केली जाणार आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते. स्थानिक कलाकारांसह तंत्रज्ञांना देखील यामुळे रोजगार उपलब्ध होऊ शकेल. आगामी काळात इथल्या कथा मडद्यावर साकार होत असताना त्याच्या निर्मितीला या फिल्मसिटीच्या माध्यमातून हातभार लागू शकेल, अशी संकल्पना या फिल्मसिटीच्या निर्मितीमागे आहे.
हेही वाचा -