कोइंबतूर (तमिल नाडु) : जर तुम्ही अभिनेता राजेश खन्ना यांचा सुपरहिट चित्रपट 'हाथी मेरा साथी' पाहिला असेल, तर तुम्हाला आठवेल की हत्ती प्रत्येक क्षणी माणसाप्रमाणे आपल्या काळजी वाहकाची कशी काळजी घेतो. तो प्रत्येक संकटात त्याची ढाल बनून उभा राहतो. तामिळनाडूची ही कहाणीही कमी रंजक नाही. या कथेतील पात्रे आणि परिस्थिती निश्चितच वेगळी आहे.
कोण आहे चिन्नाथंबी? : ही कहाणी आहे चिन्नाथंबीची. चिन्नाथंबी हे एका हत्तीचं नाव आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी चिन्नाथंबीला 'उन्मत्त' असल्याबद्दल राखीव क्षेत्रातून हाकलून लावण्यात आलं होतं. पण आता त्याला पुन्हा परत आणण्यात आलंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, त्या बेशिस्त हत्तीला पुन्हा का आणलं? याचं कारण देखील खूप मनोरंजक आहे. त्याला इतर बेशिस्त हत्तींना नियंत्रित करण्यासाठी आणण्यात आलं आहे. या बेशिस्त हत्तींमध्ये त्याच्या एका 'मुलाचा'ही समावेश आहे.
![Elephant Brought Back](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-02-2025/23550805_elephant-2.jpg)
बेशिस्त हत्तीला करणार नियंत्रित : पण इथे प्रश्न असा आहे की, एक बेशिस्त हत्ती दुसऱ्या बेशिस्त हत्तीला कसं नियंत्रित करू शकतो? याचं उत्तर प्रशिक्षण आहे. खरंतर, चिन्नाथंबी एकेकाळी 'गुंड' होता, पण प्रशिक्षणामुळं तो कुमकीमध्ये रुपांतरित झाला आहे. कुमकी म्हणजे प्रशिक्षित हत्ती. तमिळनाडू वन विभागाने चिन्नाथंबीला अन्नामलाई व्याघ्र प्रकल्पातून कोईम्बतूर जिल्ह्यातील थडागम व्हॅलीमध्ये जंगली हत्तींना हाकलून लावण्यासाठी आणलं आहे. तर जिल्ह्यातील पश्चिम घाटावरील थडागम, अनैकट्टी आणि मंगराईच्या खोऱ्यात आणला तेव्हापासून चिन्नाथंबी हा चर्चेचा विषय बनला.
![Elephant Brought Back](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-02-2025/23550805_elephant.jpg)
प्रशिक्षित होऊन चिन्नाथंबी परतला : ३५ वर्षीय चिन्नाथंबी पूर्णपणे प्रशिक्षित होऊन परतलाय. आता तो लोकांचं रक्षण करण्यासाठी परत आला आहे. मानवी वस्तीत घुसखोरी करणाऱ्या जंगली हत्तींना हाकलून लावल्याबद्दल चिन्नाथंबीला 'मसिहा' म्हणून पाहिलं जातं. चिन्नाथंबी, ज्याला कुमकी म्हणूनही ओळखलं जातं, त्याच्यासोबत पेरियाथाम्बी आणि विनायगन हे दोन इतर हत्ती आहेत. एक काळ असा होता जेव्हा जंगलाभोवती राहणारे शेतकरी त्यांच्यामुळं वैतागले होते. कारण ते शेती पिकांचं नुकसान करायचे. पेरियाथंबीला २००७ मध्ये आणि विनायगनला २०१८ मध्ये हद्दपार करण्यात आलं. पेरियाथंबीला सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं आणि विनायगनला मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं होतं.
तीन हत्तींचं निरीक्षण : आज या तीन हत्तींना कुमकीचा दर्जा मिळाला आहे. याचा अर्थ ते पूर्णपणे प्रशिक्षित आहेत. आता त्यांचा वापर इतर उन्मत्त हत्तींना नियंत्रित करण्यासाठी केला जात आहे. ते इतर हत्तींना हाकलून लावतात, त्यामुळं शेतकऱ्यांचं पीक नष्ट होण्यापासून वाचत आहे. पर्यावरणतज्ञ आणि कोइम्बतूर वन्यजीव संरक्षण ट्रस्टचे सचिव यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं की, चिन्नाथंबी, विनायगन आणि पेरियाथंबी या तीन हत्तींचं ते १५ वर्षांहून अधिक काळ निरीक्षण करत आहेत.
हेही वाचा -
- मुंबईकरांच्या 'अनारकली'चा मृत्यू, आता प्राणी संग्रहालयात पाहता येणार नाही हत्ती
- हॅपी बर्थडे हत्ती... 'जागतिक हत्ती दिना'च्या पर्वावर कोलकासमध्ये खास सेलिब्रेशन - Elephant Day celebrated in Amravati
- जागतिक हत्ती दिन 2024 विशेष: झारखंडच्या हत्तीचं 'हे' वैशिष्ट्य ठरतंय खास, पलामू व्याघ्र प्रकल्पात आहेत 180 हून अधिक हत्ती - World Elephant Day 2024