मुंबई - 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियानं केलेल्या एका अश्लील कमेंटनं संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणात, रणवीर अलाहाबादिया आणि शोचे परीक्षक असलेले कॉमेडियन समय रैना याच्यासह इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण वाढत असल्याचं पाहून रणवीर अलाहाबादियानं ताबडतोब एक व्हिडिओ पोस्ट केला आणि लोकांची माफी मागितली, तर आता सुमारे ४ दिवसांनंतर, समय रैनानंही आपलं मौन सोडले आणि आपली बाजू मांडली आहे.
स्टँड-अप कॉमेडियन असलेल्या समय रैनानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टेटमेंट शेअर केलं आहे आणि म्हटलंय की त्यानं त्याच्या चॅनेलवरून 'इंडियाज गॉट लेटेंट' शोचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत आणि तो तपास अधिकाऱ्यांना 'पूर्ण सहकार्य' करत आहे. लोकांचे मनोरंजन करणं हे त्याचं एकमेव ध्येय असल्याचंही त्यानं सांगितलं.
समय रैनाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, "जे काही घडलं ते हाताळणं माझ्यासाठी खूपच कठीण होतं. मी माझ्या चॅनेलवरुन इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. लोकांना हसवणं आणि त्यांचा चांगला वेळ घालवणं हेच माझं मुख्य ध्येय होतं. मी सर्व एजन्सीजना त्यांच्या निष्पक्ष चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करत आहे. आभारी आहे."