मुंबई - Salman Khan shooting case : आज दुपारच्या सुमारास पोलीस आयुक्तालय परिसरात असलेल्या लॉकअपमध्ये सलमान खान गोळीबार प्रकरणामधील एका आरोपीनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अनुज थापन वय 32 असं या आरोपीचं नाव आहे. त्याला ताबडतोब पोलीस आयुक्तालयाच्या शेजारी असलेल्या जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
सलमान खान गोळीबार प्रकरण : सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणात सर्व आरोपींवर मोक्का कायदा लावल्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेच्या कक्ष 9 कडून सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय नाळे यांच्याकडे वर्ग करण्यात आलं आहे. तसंच, बिश्नोई गँगचा तपास महाराष्ट्रातील गुन्हे शाखा करत आहे. आरोपी विकी गुप्ता (वय 24), सागर पाल (वय 21) आणि अनुज थापन (वय 32) यांना विशेष मोक्का न्यायालयानं 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याचप्रमाणे आरोपी सोनूकुमार बिश्नोई (वय 37) याची वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान अनुज कुमार थापन आणि सोनू कुमार बिश्नोई या दोघांनी पनवेल येथे राहात असलेल्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांना दोन पिस्तूल पुरवली होती. सोनू कुमार विष्णू आणि अनुज थापन या शस्त्र पुरवणाऱ्या दोघांना पंजाब मधून अटक करण्यात आली होती. अनुज थापननं आज दुपारी लॉक अपमध्येच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुढील उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. मात्र उपचारादरम्यान अनुज थापन याचा मृत्यू झाला असल्याचं जीटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घोषित केलं.