मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईत रेल्वेच्या तिन्ही हार्बर, वेस्टर्न आणि सेंट्रल मार्गांवर आज (16 फेब्रुवारी) मेगाब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळं जर तुम्ही कुठं फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर मुंबई लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. दरम्यान, मध्य रेल्वेवर विविध देखभालीच्या आणि अभियांत्रिकी कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीय.
मुख्य मार्गावर मेगाब्लॉक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार या स्थनाकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.35 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर घाटकोपर स्थानकातून सकाळी 10.19 ते दुपारी 3.29 पर्यंतच्या कालावधीत सुटणाऱ्या धीम्या लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान अप-जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या लोकल दादर, परळ, कुर्ला, शीव, माटुंगा आणि भायखळा स्थानकांवर थांबणार आहेत.
दुसरीकडं वाशी आणि कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएसटी येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीसाठी जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या तसंच पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 पर्यंत सीएसएसटीकडं येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
विशेष गाड्या सुरु राहणार : या मेगाब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला. तसंच पनवेल ते वाशी या स्थानकादरम्यान काही विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जाणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे, वाशी आणि नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10.00 ते 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. तसंच हा मेगाब्लॉक विविध पायाभूत सुविधांच्या देखभाल, अभियांत्रिकी कामासाठी आवश्यक असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय.
हेही वाचा-