मुंबई Navra Maza Navsacha 2 Collection Day 1: 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेकजण याच्या रिलीजची वाट पाहात होते. 19 वर्षांपूर्वी 'नवरा माझा नवसाचा' चित्रपट आला होता, त्याचा हा सीक्वेल आहे. 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता हा बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर रुपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. शुक्रवारी, 20 सप्टेंबर रोजी 'नवरा माझा नवसाचा 2' रिलीज झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
'नवरा माझा नवसाचा 2'ची कमाई :20 सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय चित्रपट दिन' असल्यानं, या चित्रपटाचा तिकिट दर 99 रुपये होता. ही प्रेक्षकांसाठी देखील चांगली संधी होती, त्यामुळे या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. अभिनेता सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा 2'चे शुक्रवारी 80 ते 90 टक्के शो हाऊसफुल होते. दरम्यान सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं पहिल्या दिवशी 1.85 कोटीची कमाई केली आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या दिवसात आहे. हा चित्रपट शनिवारी आणि रविवारी जोरदार कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.