हैदराबाद Ramoji Rao Success in Media :मीडिया हा व्यवसाय नाही, तर समाजाला जागृत करणारं माध्यम आहे, असा रामोजी रावांचा विश्वास होता. 1969 मध्ये, रामोजी राव यांनी अन्नदाता मासिकाच्या माध्यमातून मीडिया क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. शेतकरी कुटुंबात जन्मलेले रामोजी राव अनेक शेतकरी कुटुंबांचे आधारवड बनले. त्यांनी कृषी समुदायात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. अन्नदाता मासिकाच्या माध्यमातून त्यांनी कृषी विज्ञान केंद्रं आणि शेतकरी यांच्यात एक अतूट पूल बांधला. त्यांनी शेतीच्या प्रगत पद्धती, तांत्रिक पद्धती, नवीन यंत्रं याविषयी अविरत माहिती दिली. मात्र या पलिकडं त्यांनी माध्यम क्षेत्रात केलेली क्रांती जगभरात नावाजली गेली.
रामोजी राव यांनी 1974 मध्ये माध्यम क्षेत्रातील पुढचं आणि अत्यंत महत्वपूर्ण पाऊल उचललं. विशाखापट्टणममध्ये केंद्रीत असलेलं ईनाडू, आज सर्वाधिक प्रसारित असलेलं तेलुगू दैनिक आहे. सार्वजनिक समस्यांशी बांधिलकी आणि सत्याशी निष्ठा, नेहमी मूलभूत वैशिष्ट्ये म्हणून अंतर्भूत केलेलं हे दैनिक आज तेलुगू वाचकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलंय. म्हणूनच आजचं संचलन, जे 1976 च्या पूर्वार्धात 48,339 प्रती होते, ते टप्प्याटप्प्यानं वाढलंय आणि 2011 च्या पूर्वार्धात उच्च पातळीवर पोहोचलं आहे. कोरोना महामारीच्या काळात वर्तमानपत्रांचं काम संपुष्टात येईल, असं अनेकांना वाटत असतानाच आजही ईनाडू दैनिक 23 मोठ्या शहरातून छापलं जाते.
ईनाडू : तेलुगू लोकांच्या स्वाभिमानाचा ध्वज : ईनाडू ही केवळ बातमी नाही, तर हा तेलुगू लोकांचा स्वाभिमानाचा ध्वज आहे. 1978 ते 1983 या काळात काँग्रेस नेतृत्वानं पाच वर्षांत आंध्र प्रदेशचे चार मुख्यमंत्री बदलले. त्या वेळी तेलुगू राष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करण्यासाठी 'तेलुगू देशम' एक नवीन राजकीय शक्ती म्हणून उदयास आली. 1983 च्या विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपल्या संपादकीय लेखात रामोजी राव यांनी हुकूमशाहीचा प्रतिकार करणं हाच आमचा उद्देश असून आम्ही तेलुगू देसमच्या पाठीशी उभं आहोत, असं स्पष्ट केलं. एनटीआरच्या कारकिर्दीत झालेल्या चुका ईनाडूनं निडरपणे सर्वांसमोर आणल्या. 1984 मध्ये काँग्रेसनं एनटीआर सरकार उलथून टाकलं, तेव्हा ईनाडूनं लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी लढा दिला.
इनाडूचा डिजिटल विस्तार : 1999 मध्ये जगभरातील तेलुगू लोकांना ताज्या बातम्या जलद आणि वेळेवर पोहोचवण्याच्या महत्त्वाकांक्षेनं Eenadu.net लाँच केलं गेलं. रामोजी राव यांनी दोन दशकं न्यूजटाइम या इंग्रजी दैनिकाचं यशस्वी नेतृत्व केलं. 26 जानेवारी 1984 रोजी सुरू झालेल्या या संस्थेनं शेकडो पत्रकारांना संधी उपलब्ध करुन दिल्या.