सोलापूर: शहरातील गुलियन बॅरी सिंड्रोमची (GBS) लागण असलेल्या संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यावर वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी माहिती दिली आहे.
सोलापूर शहरात एका चाळीस वर्षीय सीए असलेल्या तरुणाचा खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. पुण्यात उपचार करून हा रुग्ण मूळ गावी म्हणजेच सोलापुरात आला होता. सोलापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाचा मृत्यू जीबीएसमुळे झाल्याची चर्चा आहे. त्याबाबत वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले," मृत्यू झालेल्या रुग्णाला जीबीएससदृश आजार असल्यासारखं वाटत होतं. आम्ही व्हिसेरा लॅबकडे पाठविला आहे. अहवालानंतरच त्याबाबत अधिकृतपणे सांगता येईल."
गुलियन बॅरी सिंड्रोमबाबत अनेकांमध्ये भीती आहे. त्याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर म्हणाले, "जीबीएस आजारावर वेळेत उपचार हाच जीबीएसवरील उपाय आहे. जीबीएसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका."
डॉक्टरांनी जीबीएस झाल्याचं केलं होतं निदान- वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सोलापुरात चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या तरुणाचा जीबीएस या आजारानं मृत्यू झाला. या आजारानं महाराष्ट्रात पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. हा तरुण पुण्यातील डीएसके विश्व परिसरात राहत होता. काही दिवसांपासून अतिसारानं आजारी पडल्यानंतर तो सोलापुरात परतला होता. अशक्तपणा जाणवल्यानंतर त्याला सोलापूर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला जीबीएस असल्याचं निदान केल्यानंतर पुढील उपचारांसाठी आयसीयूमध्ये हलविण्यात आलं. वैद्यकीय निरीक्षणाखाली असतानाही तो तरुण हातपायदेखील हलवू शकत नव्हता. शनिवारी त्याला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आलं. मात्र, त्याला श्वसनाचा त्रास सुरुच होता. शनिवारी त्याचा मृत्यू झाल्याचं मृताच्या नातेवाईकांनी सांगितलं.
पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या वाढली आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यावर जीबीएस होतो, असे आढळून आलं आहे. पाण्यामुळे संसर्ग होतो, असे आढळून आलं आहे. या आजारावरील उपचारांसाठी जर रुग्णालये अवाजवी बिल आकारत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल-आरोग्य मंत्री, प्रकाश आबिटकर
- आजाराची काय आहेत लक्षणे- जीबीएसची लागण झालेल्या रुग्णाच्या लक्षणांमध्ये अतिसार, पोटदुखी, ताप आणि मळमळ किंवा उलट्या यांचा समावेश आहे. दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्यानं जीबीएसचा संसर्ग होऊ शकतो. संसर्गामुळे रुग्णाला अतिसार आणि पोटदुखी होऊ शकते.
- नागरिकांनी काय काळजी घ्यावी? उकळलेले पाणी पिणे, उघड्या जागेत किंवा शिळे अन्न खाणे टाळणे, या गोष्टींची काळजी घ्यावी, असे आरोग्य विभागानं आवाहन केलं आहे. हात आणि पायांच्या स्नायूंमध्ये अचानक दुबर्लपणा जाणविल्यास नागरिकांना फॅमिली डॉक्टर किंवा जवळच्या सरकारी रुग्णालयात जाण्याचा आरोग्य विभागाकडून सल्ला देण्यात आला.
- पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जीबीएसच्या रुग्णांची ७३ इतकी संख्या नोंदवण्यात आली आहे. त्यापैकी १४ व्हेंटिलेटरवर आहेत. तर शनिवारी जीबीएसचे नऊ संशयित रुग्ण आढळले.
हेही वाचा-