मुंबई- मराठी भाषेच्या मुद्द्यावर कायम आक्रमक असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने "हॉटस्टार" या ओटीटी ॲपच्या कार्यालयात धडक दिली. क्रिकेटसह इतर खेळांचे समालोचन विविध भाषांमध्ये होत असते. मात्र, मराठीतून होत नाही, याबाबत मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. तुम्हाला कोणती मदत हवी, ती आम्ही करायला तयार आहोत. फक्त कधीपासून मराठीतून समालोचन सुरू करणार, असा थेट सवाल खोपकर यांनी केलाय. त्यावर हॉटस्टारच्या मुख्यालयाने मराठीतून देखील समालोचन होईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर खोपकर यांनी आंदोलन तूर्त मागे घेतलंय.
मराठी समालोचन उपलब्ध का नाही? : हॉटस्टार ओटीटी ॲपवरून क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, कबड्डी इत्यादी खेळांचे लाईव्ह स्ट्रीमिंग होत असते. त्यावरील समालोचन इंग्रजी तसेच भारतातील विविध भाषांमध्ये होते. मात्र, मराठीतून होत नसल्यावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. अमेय खोपकर यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मुंबईतील लोअर परळ या भागातील कंपनीच्या कार्यालयात धडकले. तेथे त्यांनी मराठी समालोचन उपलब्ध का नाही, असा जाब विचारला. आश्वासन पूर्ण न झाल्यास हॉटस्टारला मनसेने इशारा दिलाय. महाराष्ट्रात माज हा फक्त मराठी लोकांनीच करायचा. इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही, असे देखील अमेय खोपकर यांनी ठणकावून सांगितलंय. आम्ही मराठी भाषेसाठी भांडतो. सामने पाहताना मराठीतून समालोचन ऐकू यावे, यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील मराठी भाषकांना विनंती करतो की, आपण मराठी भाषेचाच पर्याय निवडावा, असे खोपकर म्हणालेत.
भेटायला नाही तर धमकी द्यायला आलो...: अमेय खोपकर यावेळी म्हणाले की, मी भेटायला नाही तर धमकी द्यायला आलो होतो. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लागावी, यासाठी जर आम्हाला आंदोलन करावे लागत असेल, तर यासारखी शोकांतिका नाही. महाराष्ट्रात आम्हाला मराठी भाषेसाठी भांडावं लागतंय. इथे आल्यावर यांचे अधिकारी मराठी माणसाला पुढे करतात. हॉटस्टारवरच्या सामन्यांचे समालोचन आम्ही मराठीमध्ये करू, असे जोपर्यंत तुमच्याकडून आम्हाला लेखी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, असे ठामपणे सांगितले होते. आता हॉटस्टारने आम्हाला एक पत्र दिलंय. आम्ही त्यांना मराठी समालोचनाच्या सेटअपसाठी वेळ देत आहोत. लवकरच आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे समालोचन मराठीमध्ये होणार, अशी त्यांनी ग्वाही दिलीय.
प्रजासत्ताक दिनी दिला होता इशारा : ‘हॉटस्टार’वर प्रसारित होणाऱ्या भारत-इंग्लंड टी-20 सामन्याचं समालोचन हरयाणवी आणि भोजपुरी भाषेतूनही केलं जातंय, पण यात मराठी भाषा नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीला ही अशी वागणूक देण्याची हिंमतच कशी होते? स्टार नेटवर्क यांना अभिजात म्हणजे काय त्याचा मनसे स्टाईल धडा द्यावाच लागेल, अशी पोस्ट अमेय खोपकर यांनी "एक्स"वर केली होती. त्यात ८ भाषांमध्ये समालोचन उपलब्ध असल्याचे त्यांनी दाखविले होते. त्यापैकी ७ भाषा या भारतीय आहेत. मात्र, मराठीचा त्यात समावेश नाही.
हेही वाचा-