बीड : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत, आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईनचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलनं जलवाहिनी कामाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे बाधित शेतकरी देविदास जयवंत थोरवे, महादेव भाकचंद थोरवे, रामा दशरथ थोरवे, खुंटेफळ, विठोबा सखाराम काळे बाळेवाडी, आसाराम विठ्ठल पठारे, बाळेवाडी यांना जमिनीचा मोबदला धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आला. यावेळी बीड जिल्हा संपर्क मंत्री पंकजा मुंडे मंत्री, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दीपक कपूर, अतिरिक्त प्रधान सचिव जलसंपदा विभाग, माजी मंत्री आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळुंके, आमदार नमिता मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते.
दुष्काळी भागाला 53 TMC पाणी मिळणार : खोखो मध्ये विश्व कप जिंकणाऱ्या खेळाडूंचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "राज्यात राबवल्या जात असलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून चार विभागातील दुष्काळी भागाला 53 TMC पाणी मिळणार आहे. दुष्काळ हा भूतकाळ होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी देण्याचं मान्य केलं आहे. त्या माध्यमातून पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर करण्यात येणार असून त्या माध्यमातून या सिंचन योजनेवर होणारा विजेचा अतिरिक्त खर्च कमी होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांची विजेची गरज भागविण्यासाठी देशात मुख्यमंत्री सौर योजना राबविण्यात येत आहे. बीडची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार" तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखी प्रकरणे खपवून घेतली जाणार नसल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.
नदीजोड प्रकल्पाला केंद्राकडून निधी मिळणार : यावेळी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं, "राज्य दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. वेगाने या योजनेला पाणी उपलब्ध करून देण्याचं काम केलं. दोन टप्प्यात ही कामे होणार आहे. हे प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण होतील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. राज्याच्या नदीजोड प्रकल्पाला केंद्राकडून निधी मिळणार याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन करतो, राज्य दुष्काळ मुक्त करायचं आहे".
जायकवाडी प्रकल्पातून अतिरिक्त पाण्याची मागणी : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं, " दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी उपसा सिंचन करावे ही विनंती केंद्र सरकारला 2003 मध्ये केली होती. यामध्ये प्रत्येकाचं योगदान असण्याचं त्यांनी सांगितलं होतं. यावेळी आमदार सुरेश धस यांनी जायकवाडी प्रकल्पातून अतिरिक्त 3 TMC पाणी देण्याची त्यांनी मागणी केली. तर दीपक कपूर यांनी या योजनेची तांत्रिक माहिती दिली.
हेही वाचा -