नाशिक : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली 'शिवभोजन थाळी योजना' (Shiv Bhojan Thali Scheme) बंद केली जाणार असल्याची चर्चा आहे. गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरू राहाणं अत्यंत आवश्यक आहे. शिवभोजन थाळी उपक्रमामुळं भुकेलेल्यांना वेळेवर दोन घास मिळतात ही समाधानाची बाब आहे. शिवभोजनच्या दररोज 2 लक्ष थाळीसाठी वार्षिक 267 कोटी खर्च येतो. शासनाच्या दृष्टीनं भुकेलेल्यांच्या पोटासाठी 267 कोटी हा खर्च तसा नगण्य आहे. त्यामुळं राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करून शिवभोजन थाळी ही योजना पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे.
लाडकी बहीण योजनेमुळं तिजोरीवर ताण : लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला राज्य सरकारवर जवळपास 50 हजार कोटींचा बोजा येणार आहे. त्यामुळं इतर योजनांना कात्री लावण्यात येणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील काही योजनांना कात्री लावण्यात येणार आहे. यात शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा ही योजना आहे. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरिबांना 10 रुपयात थाळी मिळते. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळं तिजोरीवर भार येतोय, त्यामुळं सर्वसामान्यांना दहा रुपयात पोटभर जेवण मिळण्याची शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाली योजना : राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी, महाविकास आघाडीच्या काळात शिवभोजन योजना 26 जानेवारी 2020 पासून सुरू केली. शिवभोजन थाळीमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण आणि 1 मूद भाताचा समावेश आहे. शिवभोजन योजना कार्यान्वित करण्यासाठी शिवभोजन ॲप्लिकेशन विकसित करण्यात आलं आहे. त्याचा वापर करुनच शिवभोजन थाळी वितरीत करण्यात येते. शिवभोजन थाळ्या वितरीत करण्यापूर्वी लाभार्थ्याचं नाव आणि फोटो घेणं बंधनकारक आहे. सद्यस्थितीत शासनाला शिवभोजन थाळी योजना चालवण्यासाठी वार्षिक 267 कोटी रुपये खर्च येत असून रोज 2 लाख गरजू नागरिकांना थाळीचे 10 रुपये दराने वाटप केले जाते.
हेही वाचा -