छत्रपती संभाजीनगर : दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. "जालना जिल्ह्यातील भोकरदन इथून पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून मुलाला कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं आहे." अशी माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. मंगळवारी (दि.४) रात्री 8.45 वाजता सिडको भागातून बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांच्या मुलाचं आहरण करण्यात आलं होतं. आरोपींच्या तपासासाठी 20 पथक तयार करण्यात आली होती. एका आरोपीचा तपास सुरू असून त्यांच्याकडं बंदूक असल्याची माहिती मिळाली आहे, त्याचा तपास सुरू असल्याचं देखील पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
मुलाचं झालं होतं अपहरण : शहरातील एन- 4 सिडको भागात मंगळवारी (दि.४) रात्री 8.45 वाजता बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांच्या सात वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं होतं. सुनील रात्री जेवण झाल्यावर घरासमोर फेरफटका मारत असताना मुलगा सायकलवर खेळत होता. यावेळी मुलाचं अपहरण चारचाकी वाहनाच्या सहाय्यानं करण्यात आलं. यावेळी सदर वाहन सीसीटीव्हीमध्ये कैद झालं होतं. तर, काही वेळानं अपहरणकर्त्यांनी निनावी क्रमांकावरून फोन करून दोन कोटींची मागणी केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं नाकाबंदी करत मुलाचा शोध सुरू केला. घटनेच्या अर्धातासनंतर मुलाच्या सुटकेसाठी दोन कोटी रुपयांची मागणी आरोपींनी सुनील तुपे यांच्याकडं केली.
भोकरदन जवळ सापडली गाडी : घटना घडल्यानंतर सुनील तुपे यांनी मुलाचा शोध सुरू केला. मुलाच्या अपहरणानंतर त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. यासाठी 30 अधिकारी 150 कर्मचाऱ्यांचं वीस पथके तयार करून शहराच्या विविध भागांमध्ये पाठवण्यात आली. यावेळी शहरातील सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान, सकाळी सदर वाहनाचा जालना जिल्ह्यातील भोकरदन इथल्या ब्रम्हगिरी गावाजवळ अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पुंडलिकनगर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. यावेळी पोलिसांनी मुलाची सुटका करत पाच जणांना ताब्यात घेतलं.
पोलिसांनी आरोपींना घेतलं ताब्यात : घटना घडल्यानंतर शहरातील कॅमेरे तपासले. त्यानंतर सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. सदर गाडी आणि मुलाचं वर्णन सर्व अधिकाऱ्यांना पाठवलं. तपास करत असताना सकाळी एक गाडी जालना जिल्ह्यातील भोकरदन इथं अपघातग्रस्त झाल्याची माहिती मिळाली. अपघातानंतर मुलाला घेऊन आरोपी गेले होते. ही माहिती कळल्यानंतर एका शेतामध्ये लपून बसलेल्या आरोपींना पोलिसांनी शेतात झडप घालून पकडलं. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. हर्षल शेवत्रे, जीवन शेवत्रे, प्रणव शेवत्रे, शिवराज गायकवाड, कृष्णा पठाडे हे आरोपी आहेत. हे सर्व आरोपी जालना जिल्ह्यातील आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आला होता आरोपी : "कृष्णा पठाडे हा आरोपी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आला होता. आरोपींनी यासाठी बिहारच्या व्यक्तीची मदत घेतली होती. सध्या पोलीस त्या वक्तीचा शोध घेत आहेत." अशी माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. सिडको एन 4 भागात सदन व्यक्ती राहतात असं लक्षात घेऊन केवळ पैसे कमावण्यासाठी आरोपींना गुन्हा केल्याच प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कुटुंबीयांनी मानले पोलिसांचे आभार : चिमुकल्याचं अपहरण झाल्यानंतर कुटुंबीयांनी देखील तपास सुरू केला. मुलगा मिळत नसल्यानं कुटुंबियांना चिंता लागली होती. दरम्यान पोलिसांना तो सापडल्यावर सर्वात आधी व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यासोबत संवाद साधला. यानंतर पोलीस आयुक्तालयात मुलाला घेऊन आल्यानंतर कुटुंबियांना अश्रू देखील अनावर झाले. मुलाच्या आजोबांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाचे आभार मानले.
हेही वाचा :