पुणे : नुकतंच दिल्ली इथं पार पडलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत भारतीय महिला संघानं विजेतेपद पटकावलं आहे. विजयी संघातील खेळाडू पुणे शहरात येत असल्याच्या निमित्तानं समस्त पुणेकरांच्या वतीनं ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळेनं आपला जीवनप्रवास सांगितला.
महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळेला खो-खो वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट म्हणून पुरस्कारदेखील मिळाला आहे. सुरुवातीला प्रियंकाला कुटुंबातून खो-खो खेळायला विरोध होता. ही आठवण सांगताना प्रियंका इंगळे म्हणाली, "मी पाचवीपासून खो-खो खेळायला सुरवात केली. जवळजवळ मी १५ वर्षे खो-खो खेळत आहे. जेव्हा खो-खो खेळायला सुरवात केली होती, तेव्हा कुटुंबाकडून विरोध केला होता. कारण, तेव्हा खो-खोमध्ये करिअर नव्हतं. तेव्हा माझ्या खो-खोच्या प्रशिक्षकांनी कुटुंबियांना समजावून सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला खेळण्याची परवानगी दिली. माझ्या कुटुंबात क्रीडा क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्यांना वाटत होत की, मी शिक्षणामध्येचं माझं पुढील करिअर केलं पाहिजे. आज आम्ही विश्वचषक जिंकलो आहोत. त्यामुळे माझ्या कुटुंबाला खूप अभिमान वाटत आहे."
घरच्यांना माझा अभिमान : पुढे खो-खो संघाची कर्णधार प्रियंका म्हणाली, " भारतीय खो-खो संघानं पहिल्याच खो-खो विश्वचषक स्पर्धेत विजय मिळविला आहे. याबद्दल संघाचं आणि तिच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. यावर विचारलं असता ती म्हणाली ," जेव्हा आम्ही पहिला वर्ल्डकप जिंकला, तेव्हा मला खूप आनंद झाला. मला संघाच्या कर्णधार पदाची संधी देण्यात आली. त्याबाबतदेखील मला खूपच आनंद होत आहे."
सांघिक कामगिरीचं फळ मिळालं : "पहिल्या सामन्यापासून माझ्यावर दबाव नव्हता. पण, पूर्ण संघाला सोबत घेऊन पुढे जायचं आहे. हा दबाव होता. अंतिम सामना नेपाळबरोबर झाला. त्यांच्यासोबत खेळण्याचा अनुभव असल्यामुळं आम्ही योग्य नियोजन करून मैदानात उतरलो. सर्वांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळं अंतिम सामना जिंकला," असं प्रियंका इंगळेनं विनम्रपणानं सांगितलं.
नेपाळला भारतीय संघानं अंतिम फेरीत केलं पराभूत- प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं अंतिम सामन्यात नेपाळी संघाला ७८-४० असे पराभूत करून विजेतेपद पटकावले. भारतीय खो-खो संघातील मुलींनी प्रथम आक्रमण केले. पहिल्या फेरीच्या शेवटी ३४-० अशी आघाडी घेतली. नेपाळच्या महिला संघानं शेवटच्या फेरीत आक्रमण केले. मात्र, त्यांना भारतीय बचावपटूंना रोखणे कठीण झाल. भारतीय संघानं ७८-४० च्या गुणांसह विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे.
हेही वाचा :