नवी दिल्ली :संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी आज प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभा आणि लोकसभा उद्यापर्यंत तहकूब करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. आज सकाळी लोकसभा सुरू झाल्यानंतर लगेच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर कथित अदानी प्रकरणावरुन आरोप करण्यास सुरुवात केली. मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर सोरोस प्रकरणावरुन आरोप केल्यानं मोठा गदारोळ झाला. विरोधकांच्या प्रचंड गदारोळानंतर लोकसभा अध्यक्षांनी सभागृह उद्यापर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली. तर दुसरीकडं राज्यसभा सभापतींनीही विरोधकांच्या गदारोळानंतर सभागृह उद्यापर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली.
विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप :संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 मध्ये आज चांगलाच वाद रंगला. आज सकाळीच लोकसभा आणि राज्यसभा तहकूब करण्यात आल्यानं विरोधकांनी मोठा हल्लाबोल केला. काँग्रेस खासदार किरण कुमार चमला म्हणाले, की "आज सकाळी आम्ही सभागृह चालावं या इराद्यानं सभागृहात दाखल झालो. मात्र अध्यक्ष सभागृह न चालवण्याच्या इराद्यानं आले असावेत. त्यांनी विरोधकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षाचे सदस्य आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे हिवाळी अधिवेशन होऊ नये, अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे," असा आरोप त्यांनी केला.