कोयना अन् चांदोली धरणातून विसर्ग सुरू, कृष्णा-वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - वारणा व कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाची पाणी पातळी सोमवारी (दि. 13 सप्टेंबर) संध्याकाळी 6 वाजता 2 हजार 163 फूट 3 इंच झाली आहे. धरणामध्ये 104.92 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी 7 वाजता धरणाची वक्रद्वारे एकूण 5 फुट 3 इंच उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 50 हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तसेच, धरणातील पाण्याची पातळी वाढल्या विसर्गामध्ये वाढ होणार आहे. यामुळे कोयना नदी पात्राजवळी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शिराळा तालुक्यातील (जि. सांगली) चांदोली धरण 99.86 टक्के भरले आहे. त्यामुळे चांदोली धरणातून सुरू असणारा विसर्ग वाढवून तो 8 हजार क्यूसेक करण्यात आला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. मंगळवारी (दि. 14 सप्टेंबर) दुपारपर्यंत कृष्णा नदीची पाणी पातळी ही 20 ते 22 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे वारणा व कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.