ठाणे : घराकडं पायी चालत जाणाऱ्या 23 वर्षीय पीडित तरुणीची 20 वर्षीय रिक्षा चालकानं भर रस्त्यात अडवून छेड काढल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकराचा तरुणीनं आरोपी रिक्षा चालकाला जाब विचारल्याच्या रागातून आरोपी चालकानं तरुणीची पुन्हा घराजवळ जाऊन छेड काढत अश्लील शिवीगाळ केली. पीडितेच्या वडिलांनी विरोध केल्यामुळे रिक्षा चालकानं त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप पीडितेनं केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नराधम रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. साहील तय्यब पठाण (20) असं अटक केलेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे.

पीडितेला भर रस्त्यात अडवून नराधमानं काढली छेड : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी भिवंडी शहरातील एका परिसरात कुटुंबासह राहत असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. पीडित तरुणी कंपनीमधील काम आटपून 13 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास शहरातील नुरी मस्जिद जवळून जात होती. त्यावेळी आरोपी साहिलनं पीडितेला भर रस्त्यात अडवलं. त्यामुळे याचा जाब पीडितेनं रिक्षा चालकाला विचारून ती घरच्या दिशेनं जात होती. यावेळी पीडिता घराजवळ पोहोचल्यानंतर नराधम रिक्षा चालकानं पुन्हा तिची छेड काढली.
पीडितेची छेड काढत अश्लील शिवीगाळ : पीडित तरुणी घरी पोहोचल्यावर आरोपी चालकानं पुन्हा पीडितेची छेड काढत तिला अश्लील शिवीगाळ केली. हा प्रकार पीडित तरुणीच्या वडिलांना दिसल्यानं त्यांनीही रिक्षा चालकास जाब विचारला. या गोष्टीचा राग येवून त्यानं पीडितेच्या वडिलांनाही शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. तिथं असलेल्या पाण्याच्या मोटारवर ठेवलेला लोखंडी पत्र्याचा तुकडा उचलून वडिलांवर जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केलं. तसेच तुम्हाला बघून घेतो अशी धमकीही दिली.
नराधम रिक्षा चालकाला ठोकल्या बेड्या : याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून 14 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास भिवंडी शहर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाच्या विरोधात भान्यासं कलम 74, 118(1), 352, 351(2) प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडे यांनी दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन रिक्षा चालकास ताब्यात घेऊन अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर देसाई करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज 14 फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचंही वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडे यांनी सांगितलं.
हेही वाचा :