अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एकही किल्ला शत्रूला कधी जिंकता आला नाही. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, खांदेरी बेटावरचा किल्ला असे महत्त्वपूर्ण किल्ले शिवाजी महाराजांनी स्वतः लक्ष देऊन बांधून घेतलेत. स्वराज्यातील एकूण 340 किल्ले विकसित करून घेतले. यामागे छत्रपती शिवाजी महाराजांना असणारं स्थापत्यशास्त्राचं उत्कृष्ट ज्ञान होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भुत अशा स्थापत्यामुळंच त्यांच्या स्वराज्यातील सर्वच किल्ले अभेद्य राहिलेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्थापत्य कले संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा छत्रपती शिवरायांच्या 395 व्या जयंतीनिमित्त हा स्पेशल रिपोर्ट.

बलाढ्य देवगिरीचा किल्ला अनेकदा तहात 'पडला' : "दक्षिणेत देवगिरी अर्थात आजचा दौलताबादचा किल्ला हा भारतातला सर्वात मोठा आणि बलाढ्य किल्ला म्हणून ओळखला जायचा. हा किल्ला मात्र अनेकदा तहात गमवावा लागला. अलाउद्दीन खिलजीनं यादवांकडून हा किल्ला तहात जिंकला. यादवांकडून पुढं तो तुघलकांकडं आला. तुघलकांकडून तो पुढं बहामनी साम्राज्याकडं आला. बहामनी साम्राज्याचं विघटन झाल्यावर हा किल्ला निजामशाहीकडं आला. निजामशाहीकडनं पुढं आदिलशाही आणि मुघलशाहीकडं हा किल्ला गेला. भव्यदिव्यं असणारा हा किल्ला सतत तहात पराजित होत राहिला. मात्र महाराजांचे 340 किल्ले कधीच पराजित झाले नाहीत," अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील छत्रपती शिवाजी थॉट्स विभागातील प्रा डॉ वैभव मस्के यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं असं आहे वैशिष्ट्य : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः लक्ष देऊन दहा ते बारा किल्ले उभारलेत. याव्यतिरिक्त इतर किल्ले हे छत्रपती शिवरायांनी स्वतः लक्ष देऊन त्याची नव्यानं बांधणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्यशैलीचं विशेष म्हणजे त्यांनी जे काही किल्ले बांधलेत किंवा ज्यांची दुरुस्ती केली, त्यांना एक महाद्वार असायचं. त्याला गोपूर म्हणतात. हे महाद्वार शत्रूला लवकर दृष्टीत येत नव्हतं. यदा कदाचित शत्रूचं सैन्य किल्ल्यात शिरलं, तर किल्ल्यामध्ये आठ ते दहा चोर वाटा असायच्या. त्यातून महाराजांच्या सैन्याला सहज बाहेर पडता येत होतं. अशी व्यवस्था देवगिरीच्या किल्ल्याला नव्हती. महाराजांच्या किल्ल्यांचं मात्र कधीही पतन होऊ शकलं नाही. या चोरवाटेतूनच महाराजाचे पुत्र राजाराम हे सिंहगडाच्या माध्यमातून जिंजीला गेलेत आणि तिथून त्यांनी राज्यकारभार केला.

रायगडाचं असं आहे वैशिष्ट्य : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः बांधून घेतलेल्या किल्ल्यांना सुरक्षेचे दोन आवरण आहेत. त्यांनी ज्या किल्ल्यांची पुनर्रचना केली, त्या अनेक किल्ल्यांमध्ये देखील असे दोन आवरण तयार केलेत. "रायगडला थॉमस निकोलसन नावाचा इंग्रजी व्यापारी 1673 ला त्याला झालेल्या अडवणुकी संदर्भात तक्रार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीला आला. त्यावेळी त्यानं रायगड पाहिला. त्यानं असं लिहून ठेवलं आहे की "रायगडावर दोन समांतर भिंती आहेत. एक भिंत ही 24 फुटांची आणि दुसरी 40 फुटांची. हा एक प्रकारचा कोट होता, शत्रूनं जर एक कोट तोडला, तर दुसरा कोट सुरक्षित राहायचा. स्थापत्याच्या बाबतीत राजे जागृत होते," असंच थॉमस निकोलसन यानं लिहिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते," असं प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी सांगितलं. "राजे पराभूत कधीच का झाले नाहीत, यामागे खरं तर त्यांचं स्थापत्यशैलीतील तंत्रज्ञान यासोबतच वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन हे महत्त्वाचं कारण असल्याचं स्पष्ट होतं," असं देखील प्रा डॉ वैभव मस्के म्हणाले.

1659 मध्ये उभारलं आरमार : "स्थापत्याच्या बाबतीत शिवरायांची कामगिरी ही फार मोठी आहे. राजेंद्र चोल या राजानं भारतात पहिल्यांदा आरमार उभारलं असलं, तरी भारतात सुसज्ज असं आरमार उभारण्याचं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. त्या काळात इंग्रजांजवळ रिवेंज नावाची तोफ होती. या तोफेवर इंग्रजांना प्रचंड गर्व होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी नावाच्या बेटावर किल्ला बांधला, त्यावेळी इंग्रज, सिद्धी आणि मुघल या तिघांनी मिळून महाराजांना त्रास देण्यास सुरुवात केली. इंग्रज आणि सिद्धींनी आपलं नौदल खांदेरी जवळ आणलं. यावेळी महाराजांच्या आरामरानं अर्ध्यातासाच इंग्रज, सिद्धी आणि मुघलांच्या संयुक्त तोफांना उध्वस्त करून टाकलं," अशी माहिती प्रा डॉ वैभव मस्के यांनी दिली.
अफजलखानाचा शामियाना स्थापत्याचा अद्भुत नमुना : छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थापत्य हे किल्ल्यांचं बांधकाम असो किंवा रस्त्यांचं बांधकाम, त्यांची शैली आगळीवेगळी आणि अद्भुत अशीच होती. "अफजल खान जेव्हा प्रतापगडाच्या खाली छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आला. त्यावेळी अफजलखानाचा जो शामियाना होता, तो छोटा असला तरी त्याची खास विशिष्ट रचना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. अफजल खान शामियानामध्ये थांबला, त्या शामियानामध्ये जे काही सुरू असायचं ते उंच पहाडावरून स्पष्ट दिसायचं. मात्र खाली असणाऱ्या अफजलखानाच्या सैन्याला शामियानामधलं काहीच दिसत नसे. यामुळं 10 नोव्हेंबर 1659 ला अफजलखान वधाचा जो काही भयंकर प्रकार घडला, तो सर्वांना ठाऊक आहे. अफजल खानाचं सैन्य पळू नये, यासाठी रस्ते बांधताना जी झाडं रस्त्यात आली, त्या सर्व झाडांना अर्धवट कापलं. अफजल खानाचं सैन्य ज्यावेळी येईल, तेव्हा ते झाडं पाडून टाकायची. अफजल खानाचं सैन्य जेव्हा येईल यावेळी त्याच्या सैन्यातील उंट, घोड्यांमुळं अर्धवट तोडलेली झाडं कोसळतील, अशी जी योजना होती ती यशस्वी झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या सैन्याकडून प्रचंड संपत्ती देखील मिळाली," असं प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी सांगितलं.
औरंगजेबाला 27 वर्षात एकही किल्ला जिंकता आला नाही : "छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकीय चातुर्य, व्यवहार कौशल्य, लोककल्याणकारी कार्य, मराठी राजभाषेला गौरव प्राप्त करून देणं हे सर्व आपण जर अभ्यासलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांची कल्पकता आपल्याला लक्षात येते. औरंगजेब हा 1681 ते 1707 पर्यंत दक्षिणेत फिरत राहिला. पण त्याला 27 वर्षात मराठ्यांचे किल्ले जिंकता आले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापत्य कलेच्या दृष्टिकोनातून हे किल्ले प्रचंड बळकट बनवलेत. या किल्ल्यांचा आज देखील अभ्यास केला जातो," असं प्रा. डॉ. वैभव मस्के म्हणाले.
हेही वाचा :