पुणे : देहू रोड इथं अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीच्यावेळी एका व्यक्तीनं अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर, दोन जखमी झाले आहेत. देहूरोड इथल्या गांधीनगरमध्ये वाढदिवसाची पार्टी चालू होती. मंडपाच्या शेजारी असलेल्या रोडच्या बाजूला काही गाड्या लावल्या होत्या. यावरून काही युवकांनी तिथं गाड्या का लावल्या? असा प्रश्न वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आलेल्या लोकांना केला. यानंतर पार्टीसाठी आलेल्या युवकांमध्ये आणि गोळीबार करणाऱ्या दोघांमध्ये वाद झाला. यानंतर युवकानं आठ-दहा लोकांना बोलावून अंदाधुंद गोळीबार केला. या प्रकरणाबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
घटना सीसीटीव्हीत कैद : गुरुवारी तरुणांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यात दुचाकीवरून आलेले दोन सराईत गुन्हेगार अंदाधुंद गोळीबार करत असल्याचं दिसत आहे. या घटनेमध्ये विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांचा मृत्यू झाला आहे. तर, नंदकिशोर यादव हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
आरोपींवर गुन्हा दाखल : "सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटली आहे. यात आरोपी शाबीर शेख आणि जॉन नावाचा इसम यांनी गोळीबार केल्याचं स्पष्ट झालं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी आरोपीस ताब्यात घेण्यासाठी तीन पथक रवाना केली आहेत. त्यांच्याविरूद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई चालू आहे." अशी माहिती देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली.
अशा घटनांना घाबरून नये : "मावळ भागातील वाढत्या गुन्हेगारीमुळं परिसरात भीतीदायक वातावरण तयार झालं आहे. अशा घटनांना घाबरून न जाता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी आणि गुन्हेगारीला पायबंद करण्यास मदत करावी." असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी केलं.
हेही वाचा :