मुंबई : "विले पार्ले पश्चिम इथली प्रेम नगर वस्ती ही महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडावर आहे. इथल्या मलनिःसारण वाहिनी, नाला सफाई, शौचालय दुरुस्ती, जलवाहिनी इत्यादी मूलभूत सुविधांसाठी एसआरए ना-हरकत देत नसेल तर, एसआरएला दिलेली ना-हरकतच महागपालिकेनं रद्द करावी." अशी मागणी आमदार पराग अळवणी यांनी केली. महानगरपालिकेच्या विविध अधिकाऱ्यांसमवेत केलेल्या पाहणीवेळी त्यांनी मूलभूत सुविधांबाबत प्रश्न अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिले.
स्थानिक रहिवाशांची अवस्था दयनीय : "डी.एच.एफ.एल. घोटाळ्यामुळं प्रेम नगर इथली झोपडपट्टी पुनर्वसन योजना बारगळल्यामुळं स्थानिक रहिवाशांची दयनीय अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत ना झोपडपट्टी पुनर्वसन होत आहे, ना मूलभूत सुविधा मिळत आहेत. मागील काही वर्षे सदर ठिकाणी मलनिःसारण वाहिनी टाकावी यासाठी प्रयत्न करून सुद्धा महानगरपालिका आणि एसआरए एकमेकांवर ढकलत असल्यानं काम रखडलं होतं. मात्र, आजच्या पाहणी दरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर काम करण्याचं मान्य केलं", अशी माहिती आमदार पराग अळवणी यांनी दिली.
आठवड्याभरात काम सुरू होणार : "परिसरातील ९ इंच जलवाहिनीचं अर्धवट सोडलेलं काम १० दिवसात सुरू करण्याचं जलअभियंता खात्याच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं. तसंच शौचालयांच्या दुरुस्तीसाठी ठरवलेला आराखडा सोयीचा नसल्यानं काम रखडलं होतं. तरी आराखडा बदलून सदर काम आठवड्याभरात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." असं आमदार पराग अळवणी यांनी सांगितलं.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची ना हरकतच रद्द करावी : "सदर ठिकाणी सांडपाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. यामुळं वस्तीमधील पडीक इमारतीच्या तळघरामध्ये पाणी साठते. यात साठलेलं पाणी पंपाद्वारे जवळील नाल्यात सोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या ना-हरकती शिवाय पंप चालवण्यास विद्युत जोडणी मिळत नाही. असं असेल तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला दिलेले ना-हरकतच महापालिकेने रद्द करावी" अशी मागणी सुद्धा पराग अळवणी यांनी केली.
हेही वाचा :