नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील शिक्षकांचे कोरोना अहवाल प्रलंबित; विद्यार्थांचा हिरमोड - नक्षलग्रस्त भागातील एकमेव शाळा
नक्षलग्रस्त देवरी तालुक्यात एकमेव जिल्हापरिषद शाळा सुरू झाली. मात्र, शिक्षकांनी विद्यार्थांना शिकवलेच नाही. त्यामुळे आठ महिन्यांनी उत्साहाने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. येथील सर्व शिक्षकांचे कोरोना अहवाल येणे बाकी असल्यामुळे शिक्षकांनी खबरदारी म्हणून न शिकवण्याचा निर्णय घेतला.

गोंदिया - कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आले आणि राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद केली गेली. तब्बल आठ महिन्यांनी राज्य सरकारने शाळा उघडण्यास हिरवा कंदील दिला. त्या अनुषंगाने २३ नोव्हेंबरपासून शाळा महाविद्यालये सुरू करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातदेखील शाळा सुरू झाल्या. मात्र, नक्षलग्रस्त असलेल्या देवरी तालुक्यात एकमेव जिल्हा परिषदेची शाळा ककोडी गावात आहे. ती शाळा उघडली परंतु शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवलेच नाही.
शिक्षकांचे कोरोना अहवाल प्रलंबित -
या शाळेतील शिक्षकांचे कोरोना चाचणीचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी न शिकवण्याचा निर्णय घेतला. शिक्षक आणि विद्यार्थी शाळेत होते पण विद्यार्थ्यांना शिकवले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. तर, दुसरीकडे तीन दिवस उलटूनही चाचणीचा अहवाल न आल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. अहवाल लवकर आल्यास आम्ही विद्यार्थ्यांना शिकवू शकू, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली.
शाळा उघडण्याआधीच शिक्षकांची चाचणी घ्यायली हवी होती -
शासनाने शाळा उघडण्याआधीच शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करायला हव्या होत्या, असे विद्यार्थी म्हणाले. देवरी भागात नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नव्हते. त्यामुळे शाळा सुरू झाल्याने आतातरी शिकता येईल, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात होती. मात्र, शाळेत येऊनही शिक्षकांनी न शिकवल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
या जिल्ह्यांमध्ये उघडल्या शाळा -
लातूर, नंदुरबार, रायगड, गडचिरोली, वर्धा, अमरावती, औरंगाबाद ग्रामीण भागातील शाळा आजपासून उघडणार आहेत. शाळा प्रशासनाने याबाबतची तयारी पूर्ण केली आहे.
या जिल्ह्यांमध्ये बंद आहेत शाळा -
मुंबई, नागपूर, ठाणे, औरंगाबाद शहर, जळगाव, नाशिक, पुणे याठिकाणी शाळा उघडणार नाहीत. दिवाळीनंतर या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये डिसेंबर आणि जानेवारीत शाळा सुरू होतील. मात्र, अंतिम निर्णय हा त्यावेळी कोरोनाच्या परिस्थितीच्या आढाव्यानतर घेतला जाईल.
राज्यात ५०० पेक्षा जास्त शिक्षक कोरोनाबाधित -
शाळा उघडण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या चाचण्यांमध्ये राज्यात तब्बल पाचशेहून अधिक शिक्षक कोरोनाग्रस्त असल्याचे पुढे आले आहे. मुंबईसह राज्यातील ५० हजाराहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल अजूनही प्रलंबित असल्याने शाळा उघडण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
हेही वाचा - राज्यात आजपासून शाळांची घंटा वाजली; जाणून घ्या कुठे उघडल्या शाळा, तर कुठे आहेत बंद
हेही वाचा - पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिसाद; राज्यातील शाळांचा आढावा...