रांची : स्कॉर्पिओ आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन सहा जण ठार झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना झारखंडमधील गिरिडीहमधील मधुबन पोलीस ठाण्याच्या परिसरातील लट्टाकट्टो इथं घडली. या अपघातात स्कॉर्पिओमधील सोमेश चंद्र, गोपाल कुमार, गुलाब कुमार, तर दुचाकीवरील बबलू कुमार टुडू, हुसैनी मियाँ या मृतकांची ओळख पटली आहे. अपघातात स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला आहे.

स्कॉर्पिओ आणि दुचाकीची समोरासमोर धडक : मंगळवारी मध्यरात्री स्कॉर्पिओ आणि दुचाकी विरुद्ध दिशेनं येत होते. यावेळी स्कॉर्पिओ चालकाला प्रकाशामुळे गाडीवरील संतुलन बिघडलं. त्यानं प्रथम दुचाकीस्वाराला धडक दिली आणि त्यानंतर गाडी झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर गाडी झाडावर आदळल्यानंतर स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला. स्कॉर्पिओमधील चार जण ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच डुमरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुमित कुमार यांनी घटनास्थळावर मधुबन पोलिसांच्या पथकालापाठवलं. पोलिसांनी अपघातग्रस्त नागरिकांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात जखमी नागरिकांना तपासून मृत घोषित करण्यात आलं.
स्कॉर्पिओमधील चार तर दुचाकीवरील दोघांचा मृत्यू : पोलीस उपविभागीय अधिकारी सुमित कुमार यांनी सांगितलं की, "माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह गाडीतून बाहेर काढले. या अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये चार जण स्कॉर्पिओमधील तर दोन जण दुचाकीवरील प्रवास करणारे आहेत. मृतांची ओळख पटवण्याच काम युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांमध्ये स्कॉर्पिओमधून प्रवास करणाऱ्या तीन मृतांची ओळख पटली आहे. यात सोमेशचंद्र रविशंकर प्रसाद सिंह, गोपाल कुमार नरेश प्रसाद सिंह, गुलाब कुमार (इसरी बाजार) यांचा समावेश आहे. हे सर्व मुंगेर मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या दरियापूर इथले रहिवासी आहेत. तर एकाची ओळख अद्यापही पटू शकली नाही."
दुचाकीवरील दोघांचा मृत्यू : या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. यात मधुबन पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या छछंधो इथले रहिवासी बबलू कुमार टुडू आणि धावतंड इथल्या हुसैनी मियाँ लाटो मियाँ अशी मृत दुचाकीस्वारांची ओळख पटली आहे.
हेही वाचा :