पुणे- येत्या काळात किल्ले शिवनेरीवर सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात येणार आहेत. तसेच पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले जागतिक वारसास्थळे घोषित करण्यासाठी सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवर दिलीय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झालाय.
महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला : यावेळी आज सकाळी 8 वाजता किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत आणि 'गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून पोलीस पथकाकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आलीय. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिलीय. येत्या 5 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा 400 वा शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत. किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर येथील मातीतून स्वराज्याची स्फूर्ती, तेज मिळते. यातून प्रेरणा घेऊन राज्याची सेवा करण्याकरीता आम्ही येथे येतो. राज्यशासनामार्फत शिवनेरी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
रायगड येथे विविध विकासकामे सुरू : छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुरू होते, शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा, जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकासकामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येतोय. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील 12 गड किल्ले नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरीता येतील, अशा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.
मावळ्यांची फौज तयार : यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवराय हे उत्तम प्रशासक होते. त्यांनी मावळ्यांची फौज तयार केली. आपल्या देशाच्या पाठीशी शिवरायांची प्रेरणा आहे. त्यांचे गडकिल्ले कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. जागतिक वारसास्थळे घोषित करण्यासाठी सादरीकरण करण्यात येणार असून, गडकिल्ले हे जागतिक वारसा होणार आहेत. तसेच एक टास्क फोर्स तयार केलाय. त्यामार्फत सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्यात येतील, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
गड किल्ले स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना : छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असून त्यांनी यामध्ये प्राण फुंकले आहे. हे गड किल्ले अभियांत्रिकी, स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. याठिकाणी आल्यावर आपल्याला एक वेगळ्याप्रकारची ऊर्जा, प्रेरणा मिळते. म्हणून या गड किल्ल्याची देश विदेशातही लोकप्रियता आहे. त्यामुळे गड किल्ले, जुन्या मंदिरांचे जतन आणि संवर्धनाची कामे करण्यात येत आहे. गड किल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून एक सर्किट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना पर्यावरणाचे रक्षण केले. छत्रपती शिवरायांची आरमारी ताकत नौदलाकरिता प्रेरणादायी आहे. नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतिमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचंही शिंदे म्हणालेत.
दोन न्यायाधीशांनी किल्ल्याला भेट दिली : यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने शिवनेरी परिसरात अनेक विकासकामे करण्यात आलीत. दोन दिवसांपूर्वी दोन न्यायाधीशांनी या किल्ल्याला भेट दिली आणि गडावर झालेल्या कामांचे कौतुक केलंय. राज्यातील इतर गडावरदेखील अशीच विकासकामे करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. महाराजांच्या विचारांवर काम करण्याचा निर्धार हे सरकारच्या वतीने करण्यात येत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय.
महाराजांनी लोककल्याणाची शिकवण दिली : छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रसंग, त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित, जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीने निर्णय घेतलेला होता. सामाजिक एकोपा, न्याय, सुशासन आणि लोककल्याणाची शिकवण दिली. त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करू यात, महाराष्ट्राला आणखी महान राष्ट्र करण्यासाठी एकजुटीने, एकदिलाने काम करू यात, शिवरायांची शिकवण आणि त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, हीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेल, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा :