ठाणे- जिल्ह्यात सतत लागणाऱ्या आगीच्या दुर्घटनांमुळे ज्वालामुखीचा तालुका म्हणून ओळख निर्माण झालेल्या भिवंडीत तालुक्यात अग्नीतांडवचे सत्र सुरुच आहे. आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत तीन गोदाम जळून खाक झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्ग लगत असलेल्या येवई गावच्या हद्दीत आर.के.लॉजिस्टीक गोदाम संकुलात बॅकारोझ परफ्युमस अँड ब्युटी प्रॉडक्टस् प्रा ली , इन्टरक्राफ्ट ट्रेडिंग प्रा. लि, फ्रेगरेंस शॉप प्रा. लि या तीन कंपन्यांचे गोदाम आहेत. या गोदामात मोठ्या प्रमाणात परफ्यूमचा साठा साठवून करून ठेवला होता. त्यातच (१९ फेब्रुवारी) आज पहाटे चार वाजल्याच्या सुमारास अचानक एका गोदामाला आग लागली. काही क्षणात आगीनं रौद्ररूप धारण केलं. ही आग पसरत जवळच्या गोदामांना लागली. या आगीच्या कचाट्यात सापडल्यानं तीन कंपन्यांचे गोदाम जळून खाक झाली आहेत. अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आग विझविण्याकरिता लागले 7 तास- आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी कल्याण डोंबिवली ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यासह पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहचले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलं. परफ्युमच्या साठ्यामुळं आग अधिकच भडकत होती. सध्या, घटनास्थळी कुलींगचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश पवार यांनी दिली आहे. ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे ७ तास लागल्याची माहितीही त्यांनी दिली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आग लागण्याचं नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही.
18 फेब्रुवारीला लागली होती भीषण आग- दुसरीकडे भिवंडी शहरातील ठाणगे आळी परिसरात गुरुदेव शॉपिंग प्लाझा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कोचिंग क्लासेसमध्ये १८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास विद्यार्थी शिकत असतानाच आग लागल्यानं खळबळ उडाली होती. त्यावेळी कोचिंग क्लासमध्ये सात ते आठ विद्यार्थी अडकले होते. ृस्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढले. भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविलं. ही आग एसीमध्ये शॉटसर्किट झाल्यानं लागल्याची माहिती अग्निशमन अधिकारी पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा-