डोनाल्ड ट्रम्प महाभियोग : सिनेटमध्ये लवकरात लवकर ट्रायल घेण्याची राष्ट्राध्यक्षांची मागणी - ट्रम्प महाभियोग सिनेट
आपल्यावरील महाभियोग प्रक्रियेचा पुढील टप्पा लवकरात लवकर आटोपण्यात यावा अशा आशयाचे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावरील महाभियोग हा सिनेटमध्ये लवकरात लवकर दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तसेच, प्रतिनिधींच्या सभागृहामध्ये झालेली चाचणी ही योग्य प्रकारे झाली नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
प्रतिनिधींच्या सभागृहामध्ये वकील, साक्षी किंवा पुरावे या सर्वांशिवाय महाभियोगाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर, आता डेमोक्रॅटिक पक्ष सिनेटला या प्रक्रियेबद्दल ज्ञान देत आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा उपलब्ध नाही, किंवा यापुढेही नसणार आहे. त्यांना जर मी पदावरून गेलेलो हवा आहे, तर मलाही लवकरात लवकर चाचणी हवी आहे, असे ट्विट त्यांनी गुरुवारी केले.
त्याअगोदर, अमेरिकन प्रतिनिधीसभेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी ट्विट करत, महाभियोग प्रस्ताव हा निर्विवादपणे सिनेटमध्ये मांडला जाईल अशा आशयाचे ट्विट केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट हे त्याला प्रत्युत्तर असल्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू आहे.
प्रतिनिधींच्या सभागृहामध्ये झालेल्या मतदानात, रिपब्लिकन पक्षाचे एकही मत माझ्याविरोधात गेले नाही. रिपब्लिकन पक्षामध्ये पहिल्यांदाच एवढी एकी पहायला मिळाली. डेमोक्रॅट पक्षातील लोकांची स्थिती सध्या इतकी वाईट आहे, की ते सिनेटमधील चाचणीला जाण्यासही तयार नाहीत, असे ट्रम्प यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले.
दरम्यान, अमेरिकी संसदेच्या 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज'मध्ये गुरुवारी पार पडलेल्या मतदानात, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाला मंजुरी मिळाली आहे. या सभागृहात २३० विरूद्ध १९७ मतांनी या प्रस्तावाला मान्यता मिळाली. सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल तसेच संविधानाचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यानंतर आता अमेरिकी संसदेच्या 'सिनेट'मध्ये याबाबत मतदान होईल.
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प महाभियोग : प्रतिनिधींच्या सभागृहात प्रस्ताव मंजूर; आता 'सिनेट'मध्ये परिक्षा!