ठाणे : ए के दाऊद या व्हॉटसअप ग्रुपवर असलेल्या २५ वर्षीय तरुणानं स्टेटस ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर वाद होऊन त्या मित्राला तिघांनी हॉटेलमध्येच राडा करत भर रस्त्यात आणून चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना भिवंडी शहरातील साहिल हॉटेल समोरील ररस्त्यावर घडली.
तीन आरोपी अटकेत : याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बळीराम सिंग परदेशी यांच्या तक्रारीवरुन कलम १०९, ११५(२), ३(५), सह म.पो. कायदा कलम ३७(१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करत मुख्य आरोपीसह तीन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद नसीम कादीर शेख (वय २५ रा. समरूबाग, भिवंडी), मन्नु अन्सारी, नसीम शेख असे अटक आरोपींची नावे आहेत. तर अल्ताफ अन्सारी (वय २५) असे गंभीर जखमी मित्राचं नाव आहे.
स्टेटस ठेवण्यास नकार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मोहम्मद नसीम कादीर शेख याचा ए के दाऊद या नावांने व्हॉटसअप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये त्याचे सर्व मित्र लूम कामगार असून, बिहार राज्यातील मधुनबी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. जखमी अल्ताफ हाही ग्रुपमध्ये असल्याने व्हॉटसअप ग्रुपवर सर्वानी एकच स्टेटस ठेवण्यास ग्रुप एडमिन मुख्य आरोपी नसीम यानं सांगितलं. मात्र, आपल्या मोबाईलमधील व्हॉटसअपवर स्टेटस ठेवण्यास त्याला जखमी अल्ताफ याने नकार देऊन विरोध करत होता. याच कारणावरून जखमी व आरोपीमध्ये भांडणही झालं होतं.
कसा रंगला थरार? : मुख्य आरोपी मोहम्मद नसीम कादीर शेख याच्यासह मन्नु अन्सारी, नसीम शेख या तिघांनी मिळून जखमी अल्ताफ याला १९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास भिवंडी शहरातील साहील हॉटेलसमोरील रस्त्यावर गाठत त्याच्याशी वाद घातला. मात्र, यावेळी हा वाद एवढा विकोपाला गेला की, तिघांनी मिळून त्याला भर रस्त्यावर बेदम मारहाण करत त्याच्या पोटात चाकू भोसकला. खळबळजनक बाब म्हणजे, त्याच्या पोटात चाकू भोसकल्यानंतरही हल्लेखोर मित्र त्याला उचलून उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्या ठिकाणी क्राईम पीआय बळीराम सिंग परदेशी यांनी तत्काळ चाकू हातात असलेल्या मुख्य आरोपीला पकडलं, तर दोघे हल्लेखोर फरार झाले होते. दुसरीकडं घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भिवंडी शहरात एकच खळबळ उडाली होती.
गुन्हा दाखल करत आरोपी अटकेत : या गुन्ह्यातील तक्रारदार भोईवाडा पोलीस ठाण्याचे क्राईम पोलीस निरीक्षक बळीराम सिंग परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता, व्हॉटसअपवर स्टेटस ठेवण्यास नकार देणाऱ्या मित्रावर चाकू हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले असून, त्याच्यावर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात रवाना केले असल्याची माहिती त्यांनी दिली. तर दुसरीकडे या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच माझ्या तक्रारीवरुन २० जानेवारीला तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा -