मुंबई - विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये काहीशी मरगळ निर्माण झाली होती. गेल्या कित्येक दिवसापासून कोणत्याही बैठका किंवा अन्य कार्यक्रम होत नव्हते. यातच आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होते की काय? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र आज मुंबईत महाविकास आघाडीचे बैठक पार पडली. या बैठकीला तिन्ही पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाबाबत चर्चा झाली आणि लवकरच तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून येत्या दोन-तीन दिवसात विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
धनंजय मुंडे यांच्या राजीनामावर जोर : दरम्यान, बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्यातील वातावरण तापले आहे. यात मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा सरकारने राजीनामा घ्यावा यावर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच राजीनामाबाबत आपण अधिक जोर लावला पाहिजे, यावरही महाविकास आघाडीमध्ये नेत्यांचे एकमत झाले. दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, ती अबाधित राखण्यास सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत आगामी काळात महाविकास आघाडीने आक्रमक झाले पाहिजे, असेही बैठकीत तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा झाली.
बांगलादेशींचे ऑडिट करावे : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा हा बांगलादेशी होता. त्याने बांगलादेशमधून भारतात घुसखोरी केली होती. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्यांचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरूनच खासदार मिलिंद देवरा यांनी स्थलांतरित बांगलादेशी रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात यावे, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरकार केंद्रात आणि राज्यात त्यांचे आहे. जो खासदार पत्र लिहितोय तोही त्यांचाच आहे. त्यामुळे जर सर्वेक्षण सरकारला करायचं असेल तर नक्की करावे. चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या प्रकारे ते सरकारमधीलच एका खासदाराला पत्र लिहावे लागते, मग हे सरकारचे अपयश म्हणायचे का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. याचबरोबर बैठकीत विधिमंडळाच्या विविध समित्यांबाबत चर्चाही चर्चा करण्यात आली. मात्र आगामी पालिका निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यावर कोणतेही चर्चा झाली नसल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.