नागपूर : दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या चालकासह मागे बसणाऱ्या सहप्रवाशाला देखील हेल्मेट (Helmet) घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. परंतु या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला. दुचाकीवर दोन हेल्मेट सांभाळायचं कसं? ठेवायचं कुठं? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, आता या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. शिवाय दुचाकीवर दोन-दोन हेल्मेट कसं आणि कुठं ठेवायचं या जटिल प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं आहे. त्यामुळं दुचाकी चालकांची चिंता मिटणार आहे.
'फोल्डिंग हेल्मेट'ची तयार केली डिझाईन : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थिनीने 'फोल्डिंग हेल्मेट'ची डिझाईन (Folding Helmet Design) तयार केली आहे. या डिझाईनला 'आंतरराष्ट्रीय पेटेंट' ही मिळालं आहे. १ ते दीड महिन्याच्या कालावधीत हे नाविन्यपूर्ण हेल्मेट तयार होणार असल्याची माहिती प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांनी दिली.
दुचाकी चालकांच्या समस्या अनेक मात्र उपाय एक : दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळं होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यामुळं राज्याच्या अनेक महत्वपूर्ण शहरांमध्ये दुचाकीने प्रवास करणाऱ्या दोघांनाही हेल्मेटची सक्ती करण्यात आली. या निर्णयामुळं वाहन चालकांना त्रास होत आहे. ही समस्या नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा निर्धार केला. 'एमएससी'ची विद्यार्थिनी आदिती देशमुखच्या मदतीनं त्यांनी चक्क 'फोल्डिंग हेल्मेटची' डिझाईन तयार केली. त्यांनी केवळ डिझाईनच तयार केली नाही तर त्याचं पेटंट ही मिळवलं आहे.
...त्यामुळं केलं संशोधन : दुचाकीस्वारांसाठी उपयुक्त ठरेल, असं 'फोल्डिंग हेल्मेट' नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी तयार केलंय. दोन हेल्मेट दुचाकीमध्ये ठेवता येणारे नाविन्यपूर्ण संशोधन त्यांनी केलं. नियमाने दुचाकी चालवताना हेल्मेट घालून गाडी चालवणं अनिवार्य आहे. हेल्मेट न घातल्यामुळं कित्येक अपघात होतात. त्यामुळं हेल्मेटची उपयुक्तता सगळ्यांना माहिती आहे. त्याकरिता दुचाकीमध्ये एकच हेल्मेट ठेवायची व्यवस्था केलेली असते. मात्र, दोघांसाठी देखील हेल्मेट अनिवार्य करण्यात आलं आहे. तर दुसरे हेल्मेट ठेवायचे कुठे? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आता यावर संशोधकांनी उपाय शोधला आहे.
आंतरराष्ट्रीय पेटेंट देखील मिळविलं : प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे आणि विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी सोबत संशोधन करून वाहन उभे केल्यावर दोन्ही हेल्मेट कसे ठेवता येईल, याकरिता फोल्डिंग हेल्मेटची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या संशोधनावर कार्य करत दोघांनीही फोल्डिंग हेल्मेटची डिझाईन बनवून त्यातील सर्व कार्यपद्धती आणि मजबुती ही नियमित हेल्मेटप्रमाणे राहील याची काळजी घेतली. त्यांनी फोल्डेड हेल्मेटकरिता आंतरराष्ट्रीय पेटेंट देखील मिळविलं आहे.
प्रत्यक्षात हेल्मेट तयार करण्यास सुरुवात : हे नाविन्यपूर्ण हेल्मेट तयार करण्याचं कार्य सुरू झालंय. या हेल्मेटची मजबूती नियमित हेल्मेटप्रमाणे असणार आहे. अपघाताच्या वेळी डोक्याला इजा होणार नाही, या प्रकारे साहित्य वापरण्यात येणार आहे. फोल्डिंग हेल्मेट उघडल्यावर व्यवस्थित उघडून ते डोक्यावर घालता येणार आहे. आजच्या परिस्थितीत जी दुचाकी वाहने आहेत, त्यामध्ये एक हेल्मेट ठेवण्याची व्यवस्था आहे. आता दुचाकीमध्ये फोल्डिंग हेल्मेट ठेवण्याची व्यवस्था होणार असल्याची माहिती प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांनी दिली.
हेही वाचा -