मुंबई : सरकारनं काही दिवसांपूर्वी पालकमंत्री पदाची घोषणा केली होती. मात्र, पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजीनाट्य समोर आल्यानं नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती. रायगडचे पालकमंत्री पद मंत्री भरत गोगावलेंना मिळावं, यासाठी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर जाळपोळ केली. यावरून महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने भरत गोगावले यांनी केलेली टीका आम्ही खपवून घेणार नाही, जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा दिला होता. मात्र, या इशाऱयाला मंत्री भरत गोगावले यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.
पालकमंत्री पदावर दावा कायम : "रायगडमधील शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी रक्ताचं पाणी करून जिल्ह्यात काम केलं. लोकसभेच्या वेळीही आमच्या पक्षाचा उमेदवार नसताना आम्ही युती धर्माचं पालन केलं आणि उमेदवारासाठी काम करून निवडून आणलं. त्यामुळं पालकमंत्री पद मिळावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांचा उद्रेक झाल्यानं रस्त्यावर आंदोलन होत आहेत. आजही रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावर आमचा दावा कायम आहे, अशी भूमिका मंत्री भरत गोगावले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मांडली.
राष्ट्रवादीला इशारा : येऊ तर मैदानात : एकीकडं महायुतीत पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य असताना भरत गोगावले यांनी केलेल्या टीकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी "संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला अशी टीका शोभत नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर यापुढे वैयक्तिक पातळीवर जर टीका केली तर आम्ही खपवून घेणार नाही," असा इशारा दिला होता. "प्रामाणिकपणे काम केलं आहे म्हणून आम्ही पालकमंत्री पदावर दावा करत आहोत. त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असेल तर ते सांगावं. त्यांनी इशारा दिलाय पण ते आधी येऊ तर द्या मैदानात," असं म्हणत मंत्री भरत गोगावलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलं आहे.
हेही वाचा -