वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आज डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीपूर्वी अमेरिकेत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अमेरिकेतील इतिहासातील सर्वात मोठी हद्दपारीची मोहीम राबवण्यात येणार असल्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पार पडलेल्या विजयी रॅलीत दिला. यासह त्यांनी एक विशेष विभाग करुन त्याच्या प्रमुखपदी एलन मस्क यांची नियुक्ती करणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं.
आज डोनाल्ड ट्रम्प घेणार राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ : आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी आज भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता पार पडणार आहे. अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते आज दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. या अगोदर त्यांनी 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलं आहे. त्यामुळे त्यांना अमेरिकन राजकारभाराचा तगडा अनुभव आहे. विशेष म्हणजे त्यांनी विजयी रॅलीला संबोधित करताना जो बायडन यांच्यावर हल्लाबोल करुन आपल्या आगामी कार्याची झलक दाखवली. त्यांचा आज होणारा शपथविधी प्रचंड थंडी असल्यानं इनडोअर होण्याची शक्यता आहे. त्यांच्या शपथविधीला भारतीय उद्योग समूहातील आघाडीचे उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी निता अंबानी या उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह उद्योगपती एलन मस्क, मार्क झुकेरबर्ग, जेफ बेजोस, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई, टीम कूक आदी उपस्थित राहणार आहेत. तर राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते माजी राष्ट्रपती बराक ओबामा, जॉर्ज बूश, बुल क्लिंटन, यांच्यासह जॉर्ज मेलोनी यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना आमंत्रित केल्यामुळे भारतासह इतर देशांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमेरिकेला महान बनवणार : डोनाल्ड ट्रम्प हे आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेत असल्यानं जगभरातील लक्ष त्यांच्या शपथविधी सोहळ्याकडं लागलं आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या विजयी रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला थांबवण्याबाबत भाष्य केलं. अमेरिकेला महान बनवण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केलं. मध्य पूर्वेतील युद्ध थांबवण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी ते म्हणाले की, "आपण आपला देश पूर्वीपेक्षाही महान बनवणार आहोत. आपण आपल्या देशाचं वैभव पुन्हा मिळवणार आहोत. अमेरिकेच्या 4 वर्षांच्या दीर्घ अधोगतीवर आपल्याला पडदा टाकायचा आहे. अमेरिकन शक्ती, समृद्धी, प्रतिष्ठा आणि अभिमानाचा एक नवीन अध्याय आपल्याला सुरू करायचा आहे." दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे आज शपथ घेणार असल्यानं ओडिशाचे सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी त्यांच्या शिल्पकलेतून डोनाल्ड ट्रम्प यांचं सुंदर चित्र साकारलं आहे.
हेही वाचा :