लातूर : उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच 5 एन 1) या विषाणूजन्य आजारानं (बर्ड फ्ल्यू ) झाल्याचं भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालातून निष्पन्न झालंय. त्यामुळं या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वर्षा ठाकूर-घुगे यांनी प्राण्यांमधील संक्रामक, सांसर्गिक रोग प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम, 2009 अन्वये आदेश दिले आहेत.
आदेशात काय म्हटलंय? : या आदेशानुसार उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय आणि पाण्याची टाकी येथील 10 किलोमीटर त्रिज्येतील परिसर सतर्क भाग (अलर्ट झोन) घोषित करण्यात आलाय. कावळ्यांचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांच्या हालचालीस, तसंच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आलाय. याठिकाणची खासगी वाहनं बाधित परिसराच्या बाहेर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच या परिसराचे सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमँग्नेटने निर्जंतुकीकरण करावं, असंही म्हटलंय. प्रभावित क्षेत्राच्या 10 किलोमीटर त्रिज्येतील कुक्कुट पक्षांचे सर्वेक्षण करुन त्यांचे वैद्यकीय नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवावे, असंही आदेशात नमूद करण्यात आलय.
नागरिकांनी भीती बाळगू नये : "जिल्हा प्रशासनामार्फत तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी कसलीही भीती बाळगू नये. तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात इतर ठिकाणी पशूपक्ष्यांचे असाधारण मृत्यू आढळल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा वन विभागाशी संपर्क साधावा", असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी केलय.
हेही वाचा -