मुंबई - टीव्ही अभिनेता योगेश महाजनचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या कुटुंबानं एक निवेदन जारी करून याबद्दल पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी अभिनेता योगेश 'शिवशक्ती तप त्याग तांडव' शोच्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचला नाही. यानंतर त्याचे सहकलाकार आणि शोचे क्रू मेंबर्स नाराज झाले होते. योगेश महाजन 'शिव शक्ती-तप, त्याग' या हिंदी मालिकेचं उमरगावमध्ये शूटिंग करत होता. या मालिकेमध्ये तो शुक्राचार्यचे पात्र साकारत होता. योगेशला शनिवारी संध्याकाळी शूटिंग संपवल्यानंतर अस्वस्थ वाटत होतं. यानंतर तो डॉक्टरांकडे गेला होता. त्यानं डॉक्टरनं दिलेली औषधी घेतली आणि तो हॅाटेलमधील त्यांच्या खोलीत झोपला. मालिकेच्या टीममधील लोकांनी त्याला अनेकदा फोन केले, मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. रविवारी तो शूटवर आला नसल्यानं क्रू मेंबर्स त्याच्या फ्लॅटवर गेले. जेव्हा त्याच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठावला, यानंतर कोणीही दरवाजा उघडला नाही. काही लोकांनी त्याचा फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. योगेश बेशुद्ध अवस्थेत त्याच्या फ्लॅटवर आढळला.
योगेश महाजनचा मृत्यू कसा झाला : यानंतर योगेशला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला होता. 'शिवशक्ती तप त्याग तांडव' व्यतिरिक्त, योगेशनं 'अदालत', 'चक्रवर्ती अशोक सम्राट' 'जय श्री कृष्णा' आणि 'देवों के देव महादेव' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. याव्यतिरिक्त योगेशनं 'मुंबईचे शहाणे' आणि 'संसाराची माया' यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. योगेशला खरी ओखळ 'शिवशक्ती तप त्याग तांडव' शोमधून भेटली.
योगेश महाजनच्या निधनानंतर आकांक्षा रावतनं केला शोक व्यक्त : योगेश महाजनची सह-कलाकार आकांक्षा रावतनं एका निवेदनात म्हटलं आहे की, "तो खूप उत्साही व्यक्ती होता. त्याची विनोदबुद्धीही खूप चांगली होती. आम्ही एकत्र शूटिंग सुरू करून एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. आता गोष्टीचा आम्हाला धक्का बसला आहे." योगेशच्या जाण्यानं त्याच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या लहान मुलाच्या डोक्यावरून वडिलांची सावली निघून गेल्यानंतर आता अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून दु:ख व्यक्त करत आहेत.