कोलकाता : कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर माथेफिरूनं बलात्कार करुन तिचा खून केल्यानं देशभर खळबळ उडाली. या प्रकरणी संजय रॉय याला न्यायालयानं शनिवारी दोषी घोषित केलं. न्यायालयानं आज संजय रॉय याला शिक्षा ठोठावली आहे. संजय रॉय याला न्यायालयानं जन्मठेप ठोठावली आहे. शिक्षा ठोठावताना न्यायालयानं संजय रॉय याला त्याची इच्छा विचारली असता, त्यानं आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं स्पष्ट केलं.
संजय रॉय याला जन्मठेप : कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर तरुणीवर माथेफिरू संजय राय यानंच बलात्कार केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आहे. न्यायालयानं संजय रॉय याला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याबाबत माहिती देताना वकील रहमान यांनी सांगितलं की, "सियालदाह इथल्या सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीशांनी संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयानं राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबाला 17 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले. सीबीआयनं या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. मात्र न्यायाधीशांनी हे दुर्मिळ प्रकरण नाही, म्हणून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही," असं स्पष्ट केलं.
कोलकाता इथल्या डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन खून : कोलकाता इथल्या आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका डॉक्टर तरुणीवर संजय रॉय यानं बलात्कार करुन तिचा खून केल्यानं देशभर खळबळ उडाली. या प्रकरणी देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारुन दोषीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली. कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरण देशभरात गाजल्यानंतर या प्रकरणाला सीबीआयकडं सोपवण्यात आलं. अखेर सीबीआयनं संजय रॉय याच्यावर आरोपपत्र दाखल केलं. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. शनिवारी न्यायालयानं त्याला दोषी घोषित करुन आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
हेही वाचा :
- डॉक्टर तरुणी बलात्कार खून प्रकरण : संजय रॉय दोषी असल्याचं न्यायालयानं केलं जाहीर, सोमवारी ठोठावणार शिक्षा
- डॉक्टर तरुणी बलात्कार खून प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आरजी कार वैद्यकीय रुग्णालयात सीआयएसएफचे जवान तैनात - Doctor Murder Rape Case
- डॉक्टर तरुणी बलात्कार खून प्रकरण; आज देशभरात डॉक्टर संघटनांचा संप, महाराष्ट्रातील 'इतके' डॉक्टर संपावर - Doctor Rape And Murder Case