मुंबई- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 23 तारखेला जयंती आहे. या 23 तारखेलाच शिवसेनेतर्फे बीकेसीत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी उठाव केला आणि बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना शिंदेंची हे त्यांनी दाखवून दिलंय. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 7 खासदार त्यांनी निवडून आणलेत आणि विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळविलंय. यावेळी 57 आमदार निवडून आणले असून, विधानसभा निवडणुकीत उबाठा गटापेक्षा आम्हाला 15 लाख मतं अधिक मिळालीत. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची? हे आता लोकांना कळलंय. 23 तारखेला बाळासाहेबांची जयंती आहे. या दिवशी हा आमचा विजय आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करणार आहोत. या दिवशी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचा नागरी सत्कार आयोजित केलाय. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात जो महत्त्वाचा आणि सिंहाचा वाटा आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींचा. त्या लाडक्या बहिणींच्या हस्तेच एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिलीय. आज त्यांनी मुंबईत 23 तारखेच्या मेळाव्याबाबत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
महापौर महायुतीचाच : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची कशा प्रकारे तयारी सुरू आहे, असा प्रश्न राहुल शेवाळे यांना विचारला असता, मुंबई महापालिका निवडणूक मागील दोन-तीन वर्षांपासून रखडलीय. परंतु आता लवकरच निवडणूक होणार असल्याचे बोललं जातंय. दरम्यान, महायुतीकडून तसेच शिवसेनेकडून आमची निवडणुकीला सामोरी जाण्याची तयारी आहे. मुंबई आणि शिवसैनिक यांचं एक वेगळं नातं आहे. मुंबई महानगरपालिकेत अनेक वर्ष शिवसेनेचे सत्ता आणि शिवसेनेचा महापौर आहे. त्यामुळे मुंबईकर हा शिवसेनेला भरभरून मत देतो. यावेळी शिवसेनेची सत्ता महापालिकेत येईल. शिवसेनेची सत्ता मिळण्यासाठी 23 तारखेच्या मेळाव्यात एक संकल्प केला जाईल. मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसेल असा मला विश्वास वाटतो, असं राहुल शेवाळे यांनी यावेळी सांगितलंय.
स्वार्थासाठी आघाडी : एकीकडे उद्धव ठाकरेंनी पालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला असताना आज अचानक शरद पवारांची भेट घेतली, असा प्रश्न राहुल शेवाळे यांना विचारला असता, ही महाविकास आघाडी म्हणजे वेगवेगळ्या विचारधारणीचे आणि विचारसरणीचे लोक केवळ सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी एकत्र आलेत. आता त्यांची सत्ता गेल्यामुळे ते बिथरले असून, आपला परिवार टिकवण्यासाठी यांच्या गाठीभेटी सुरू आहेत, अशी खोचक टीका राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केलीय. दरम्यान, शिवसेनेच्या मेळाव्यानंतर विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात आम्हाला घवघवीत यश मिळाले. तिथे स्वतः आमचे नेते एकनाथ शिंदे जाऊन आभार यात्रा काढणार आहेत. यात्रेच्या माध्यमातून लोकांना ते धन्यवाद देणार असल्याची माजी खासदार राहुल शेवाळेंनी यावेळी सांगितले.
23 तारखेला राजकीय भूकंप : मंत्री उदय सामंत हे 20 आमदारांना घेऊन काही वेगळा निर्णय घेणार आहेत, असं विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. यावर बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, शिवसेनेच्या पक्षाबद्दल संजय राऊत आणि वडेट्टीवार यांनी काळजी करू नये. त्यांनी त्यांचा पक्ष कसा टिकेल याची काळजी करावी, असं शेवाळे म्हणालेत. तसेच नवीन उदय वगैरे काही नाही. उदय हा 2022 रोजी सूर्याचा झालेला आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी उठाव केला तोच एक राजकीय नवीन उदय होता आणि एकनाथ शिंदे हेच सूर्य आहेत. सूर्य हा एकच असतो. जर का आमदारांमध्ये नाराजी असेल तर ते दूर करतील. परंतु 23 तारखेला मोठा राजकीय भूकंप होणार आहे, उबाठा गट आणि काँग्रेसमधील 10-15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते आमदार फुटू नये, शिवसेनेत येऊ नये, म्हणून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार असे खोटे वक्तव्य करून अफवा पसरवत आहेत, अशी टीका राहुल शेवाळे यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर केलीय. दरम्यान, ठाकरे गटातील 15 आमदार आणि काँग्रेसमधील 10 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं यावेळी शेवाळेंनी सांगितलंय.
केंद्रात भूकंप होणार : दुसरीकडे राज्यात 23 तारखेला मोठा भूकंप होणार असल्याचं शेवाळेंनी म्हटल्यानंतर दुसरीकडे केंद्रातही तुम्हाला भूकंप झाल्याचे पाहायला मिळेल. ठाकरे गटाचे काही खासदार आमच्या पक्षात येण्यास इच्छुक असून, काही खासदार हे आमच्या संपर्कात असल्याचं शेवाळे म्हणाले. दरम्यान, काँग्रेस आणि ठाकरे गटातील आमदार, खासदार हे फुटू नये, ते कुठल्या पक्षात जाऊ नये म्हणून त्यांना विश्वास देण्यासाठी आणि आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते दोघेही विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत खोटी वक्तव्यं करताहेत. परंतु आता त्यांच्या पक्षाचा अस्त होत चाललेला आहे. त्यांचा पक्ष संपत चालला आहे. याकडे त्यांनी लक्ष द्यावं, आमच्या पक्षाची काळजी करू नये, असा टोलाही राहुल शेवाळेंनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांना लगावलाय.
हेही वाचा -