मुंबई- बदलापूर येथील चिमुरड्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन सरकारचे फेक नरेटिव्ह उघड पाडलेत, अशी टीका विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. या एन्काऊंटरला पोलीस जितके जबाबदार आहेत, तितकेच जबाबदार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय.
शिंदे एन्काऊंटरप्रकरणी पाच पोलीस जबाबदार : याबाबत वडेट्टीवार म्हणाले, बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आलाय. त्याचप्रमाणे बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आलंय. बदलापूरप्रकरणी एकीकडे भाजपा संस्थाचालकांवर कारवाई झाली नाही, तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचं फेक एन्काऊंटर करून भाजपाशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आलंय, असा आरोप त्यांनी केलाय.
फेक नरेटिव्हची उच्च न्यायालयाकडून पोलखोल : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केलीय, असे ते म्हणाले. या एन्काऊंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे, तितकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे, असा आरोप त्यांनी केलाय. कारण ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा न्याय‘ म्हणून स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटरचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येतोय, अशी टीका त्यांनी केलीय.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खोटा : विशेष म्हणजे फेक एन्काऊंटरवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनीही फडणवीस सरकारवर टीका केलीय. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खोटा होता. तेव्हाच्या तत्कालीन सरकारला स्वतःची इमेज रॉबिनहूड म्हणून महाराष्ट्रात करायची होती. न्यायालयाने निर्णय देण्याआधीच न्याय द्यायचा ही जी ओढ लागली आहे, महाराष्ट्रासाठी ते बरोबर नाही, हे कायद्याचे राज्य आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत. ठाणे पोलीस फक्त राजकीय हस्तक म्हणून कम करतायेत, मर्डरचा आरोपीलादेखील सोडवण्याची मजल ठाणे पोलिसांची गेलीय. अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलं, त्यातील जे गुन्हेगार आहेत, त्यांना लपवायचं होतं. हा खून आहे, हा मर्डर आहे, पोलिसांना सांगितलं होतं याला ठोका आम्ही बघू, असंही आव्हाडांनी सांगितलंय.
माझ्याकडे साक्षीदार आहेत : कायदा आमच्या हातात आहे, असं जेव्हा या राज्यकर्त्यांना वाटू लागलंय, तेव्हापासून हे सर्व सुरू झालंय. मर्डरच्या आरोपीला अटक करायला गेलेल्या पोलिसांना ठाणे पोलिसांनी फोन करून मागे बोलावलं. सर्वच खोटं रचलं होतं, जेव्हा खोटं करतो, तेव्हा काही ना काही मागे राहतच. ही फायरिंग कुठे झाली, ही गाडी कुठे थांबली सर्वच खोटं, माझ्याकडे साक्षीदार आहेत. माझा एकही आरोप खोटा ठरणार नाही याची गॅरंटी आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
हेही वाचा -