छत्रपती संभाजीनगर: पर्यावरणावर काम करण्याची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेषतः कॅरीबॅग (Plastic Bags) वापरावर बंदी असणे काळाची गरज झाली आहे. मात्र, अद्याप सर्वसामान्यांमध्ये त्याबाबत गांभीर्य आलं नसल्याचं वारंवार निदर्शनास येतं. यावर उपाय म्हणून शहरातील शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी वेगळी सुरुवात केली आहे. गेल्या 25 वर्षांपासून त्यांच्या कुटुंबानं कॅरीबॅगचा वापर करणं पूर्णपणे बंद केलं आहे.
स्वतःच्या घरातून केली सुरुवात : श्रीनिवास औंधकर मराठवाड्यासाठी परिचित असं नाव मानलं जातं. पर्यावरणाचे अभ्यासक शास्त्रज्ञ म्हणून ते सर्वश्रुत आहेत. पर्यावरणावर नुसते बोलणे किंवा जनजागृतीसाठी व्याख्यान देणे यापेक्षा स्वतः काही प्रयत्न केले पाहिजे, असा विचार ठेवून त्यांनी 25 वर्षांपूर्वी स्वतःच्या घरातून सुरुवात करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला थोडा त्रास झाला. मात्र नंतर ही चांगली सवय अंगवळणी पडली आणि आज घडीला कॅरीबॅगचा वापर न करता देखील त्यांचं काम होतं. पृथ्वीला वाचवायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून करायची म्हणून त्यांनी अनोखा उपक्रम राबवल्याची माहिती शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
"पृथ्वीवरील मनुष्यवस्ती निर्माण होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागला आहे. मोठ्या परिश्रमाने हे जीवन मिळालं असूनही आज ते नष्ट होत आहे. समाजात जागृती करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे". - श्रीनिवास औंधकर, शास्त्रज्ञ
अनेक वेळा त्रास : आज बाजारात गेलं की आपण हात हलवत जातो आणि वस्तू विकत घेतली की स्वतःच कॅरीबॅग मागतो. तिथूनच प्रदूषण वाढीला सुरुवात होते. असे प्रकार थांबवण्यासाठी श्रीनिवास औंधकर यांनी प्रयत्न करण्याचं ठरवलं. त्यांना साथ दिली त्यांची पत्नी रुपाली औंधकर यांनी. बाजारात जाताना आपली पिशवी सोबत घेऊन जाणे, एखाद्यावेळी अचानक काही खरेदी करावी लागली तर प्लास्टिक बॅग नको म्हणत कागदी पिशवीची मागणी त्या करतात. काहीवेळा घेतलेलं सामान रुमालात बांधून त्यांनी घर गाठलं आहे. इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीला रुमालात बांधून भाजी किंवा काही वस्तू घेऊन जाताना लोक काय म्हणतील यापेक्षा पर्यावरण वाचवणं अधिक महत्त्वाचं आहे असा विचार त्यांनी केला. आज 25 वर्षे झाली ही सवय औंधकर दाम्पत्याच्या आयुष्याचा भाग झाला आहे. तर दोन मुलांनी देखील ही सवय लावल्याची माहिती, रुपाली औंधकर यांनी दिली.
चला पृथ्वीला पुन्हा समजून घेऊ या : एमजीएम विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञानबाबत विशिष्ठ विभागाचे प्रमुख म्हणून श्रीनिवास औंधकर काम पाहतात. अनेक ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं जातं. त्यावेळी "चला पृथ्वीला पुन्हा समजून घेऊ या" या विषयावर ते जनजागृती करतात. आपण ज्या पृथ्वीवर राहातो तिच्या निर्मितीला कसा कालावधी लागला, त्यात किती बदल झाला. मात्र आज पुन्हा आपल्या पृथ्वीला समजून घेतल्यास तिचं संरक्षण करणं किती गरजेचं आहे, याबाबत जागृती करण्याचं काम ते करतात. तर आपण विश्वात एकटे आहोत का? या बाबत माहिती देताना विश्वात पृथ्वी एकटाच ग्रह नाही. मात्र त्यात ती कशी वेगळी आहे, तिचं महत्त्व काय? यावर माहिती देऊन नव्या पिढीला पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा वेगळा कार्यक्रम घेतात. तसंच समाजात सुधारणा करण्याचा प्रयत्न श्रीनिवास औंधकर सातत्याने करत आहेत.
व्यावसायिकांना देखील लागली सवय : श्रीनिवास औंधकर आणि त्यांच्या पत्नी रुपाली 25 वर्षांपासून कॅरीबॅग घेण्यास मनाई करत असल्यानं नेहमी जात असलेल्या दुकानात व्यावसायिक त्यांना पाहून स्वतःच कागदी पिशवीत भाजी बांधून देतात. श्रीनिवास औंधकर यांनी एक घटना सांगितली, ते चप्पल घेण्यासाठी गेले असता सांगितलेल्या किंमतीत त्यांनी मोलभाव केला. त्यावेळी दहा रुपयांवर घासाघीस झाली. शेवटी सरांनीच दहा रुपये जास्त दिले. चप्पल ताब्यात घेताना दुकानदाराने कॅरीबॅग दिली. त्यावेळी सरांनी ती नाकारली. दुकानदाराने पहिल्यांदा असा ग्राहक पहिला म्हणत वीस रुपये परत दिले. त्यांनी देखील त्यांच्या कार्याचा सन्मान केला. असे अनेक चांगले अनुभव असल्यानं प्रेरणा मिळाली असं आवर्जून श्रीनिवास औंधकर यांनी सांगितलं.
हेही वाचा -