नाशिक : 'व्हॅलेंटाईन डे' च्या पार्श्वभूमीवर गुलाबाला देशभरातून मोठी मागणी वाढलीय. गेल्या काही दिवसांपूर्वी 7 रुपयांना विकला जाणारा गुलाब 10 रुपयांना विकला जात आहे. यात ग्राहक टॉप सीक्रेट गुलाबाला अधिक पसंती देत असल्याचं फुल उत्पादक शेतकरी पंकज पिंगळे यांनी सांगितलं.
'व्हॅलेंटाईन डे' मुळं गुलाब खात आहे भाव : द्राक्ष, कांदा पाठोपाठ नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबाची शेती केली जाते. प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबाला ओळखलं जातं. मग एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी, लग्न समारंभ, वाढदिवस किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी देखील गुलाबाला मोठी मागणी असते. 14 फेब्रुवारी होणाऱ्या 'व्हॅलेंटाईन डे' मुळं गुलाब भाव खाऊन जात आहे. दोन महिन्यांपूर्वी 150 रुपये डझनने विकला जाणारा गुलाब आता चक्क 200 ते 220 रुपये डझनने विकला जात आहे. त्यामुळं बाराही महिने विविध समारंभासाठी फुलांची मागणी असल्यानं शेतकरी फुल शेतीकडं वळाला आहे.
मुंबई दिल्लीला होते गुलाबाची निर्यात: शहरातील मखमलाबाद सोबत जिल्ह्यातील दिंडोरी, खेडगाव, पालखेड, मोहाडी, जानोरी या भागात 80 हेक्टर क्षेत्रावर फुलशेती केली आहे. तसेच 15 हेक्टरवर पॉलिहाऊसमध्ये विविध प्रकारच्या गुलाबाचं उत्पादन होतं. यात टॉप सीक्रेट, बोंडेक्स, सिलीयर, सफेद गुलाब, पिंक गुलाब अविलॉन्च या गुलाबांना देशभरातून अधिक मागणी आहे. नाशिकमधून दररोज दिल्लीला एक लाख तर मुंबईला दोन लाख गुलाब निर्यात केली जाते. तसेच हाच गुलाब पश्चिम आशियासह सिंगापूर, युरोपात व्यापाऱ्यांमार्फत पाठवला जातो.
अनुकूल वातावरण: "नाशिक जिल्ह्यातील वातावरण गुलाब शेतीला अनुकूल आहे. त्यामुळं बहुतांशी शेतकरी आता फुलशेतीकडं वळाला आहे. इतर पिकांच्या तुलनेत फुलशेतीत जोखीम कमी असून बाजारपेठही उपलब्ध होते. आमचे गुलाब व्यापाऱ्यांमार्फत मुंबई, दिल्लीला जातात. तसेच स्थानिक बाजारपेठेत इव्हेंट मॅनेजमेंट आणि फुल विक्रेत्यांमार्फत आम्ही आमच्या फुलांची विक्री करतो", असं संजय पिंगळे यांनी सांगितलं.