सातारा :कराड-रत्नागिरी मार्गावर लोहारवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा ट्रक उत्पादन शुल्क विभागानं शनिवारी पकडला. ट्रकमधून वाहतूक केली जाणारी 78 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी ट्रक चालक बनवारी राम (वय 33, रा. जोधपूर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे.
औषधांच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; 78 लाखांचा मुद्देमाल जप्त, राजस्थानच्या ट्रक चालकास अटक - liquor Smuggling
liquor Smuggling : उत्पादन शुल्क विभागानं कराड रत्नागिरी मार्गावर शनिवारी मोठी कारवाई केली आहे. औषधांच्या वाहतुकीच्या नावाखाली दारूची तस्करी करणारा ट्रक पकडला. या कारवाईत गोवा बनावटीचा 78 लाखाची दारू जप्त करण्यात आली आहे.
Published : Jul 20, 2024, 10:29 PM IST
दहा चाकी ट्रकमधून दारूची तस्करी : दहा चाकी ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती कराड उत्पादन शुल्क विभागाला खबऱ्याकडून मिळाली होती. त्या आधारे कराड-रत्नागिरी मार्गावरील लोहारवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत सापळा रचून ट्रक अडवण्यात आला. ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये 87 लाखांच्या रॉयल ब्ल्यू मार्ट व्हिस्कीच्या 15 हजार बाटल्या आढळल्या.
कारवाई करणाऱ्या पथकाचं कौतुक :सातारचे अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक डॉ. उमा पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी. आर. गायकवाड, जवान विनोद बनसोडे, महिला जवान राणी काळोखे यांनी ही कारवाई केली. या कारवाईबद्दल उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी कारवाई करणाऱ्या पथकाचं कौतुक केलं. उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक डॉ. उमा पाटील या अधिक तपास करीत आहेत.