पुणे : नाजूक कलाकुसर असणारी एखादी वस्तू तयार करण्यासाठी अनेक महिन्यांचा अवधी लागतो. हीच गोष्ट फाउंटन पेनच्याबाबतीत देखील खरी आहे. जपानी कलाकारांनी रुशी कलेचा वापर करून तयार केलेल्या तीन लाख रुपयांच्या फाउंटन पेनबरोबरच आकर्षक डिझाइन असणारे लाखो रुपये किंमतीचे पेन्स 'आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवात' पुणेकरांना पाहायला मिळाले.
तीन लाख रुपयांचा पेन : पुण्यात रायटिंग वंडर्स आणि व्हीनस ट्रेडर्सच्या वतीनं आठव्या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 'पेलिकन' या कंपनीनं तयार केलेला 'एम-1000 रेड इन ब्लॅक इन्फिनिटी' हा तीन लाख रुपयांचा पेन या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरला. या पेनचं निब हे 18 कॅरेट सोन्याचं आहे. जपानी कलेचा वापर करुन हा पेन तयार करण्यात आला. हा पेन तयार करण्यासाठी रुशी आर्टचा वापर करण्यात आलाय. या पेनची निर्मिती करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागत असल्याचं अनिश तोडरवाल यांनी सांगितलं. तर 'टोलेडो आर्ट'चा वापर करून तयार करण्यात आलेला सव्वा दोन लाख रुपये किमतीचा पेनदेखील या महोत्सवाचं आणखी एक आकर्षण ठरला. सोने आणि चांदीचं प्लेटिंग ही या पेनची खासियत आहे.
महापुरुषांच्या स्वाक्षरीचे पेन्स : 'वोल्ड्मन' हा 100 वर्षांहून अधिक जुना असणारा पेन तयार करणाऱ्या कंपनीच्या 'मॅनेजर' या चांदीच्या पेनानं देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा पूर्ण पेन चांदीचा असून त्याचे निब सोन्याचं आहे. या पेनमध्ये शाई भरताना त्यामध्ये आवाज येतो. सव्वा लाख रुपये अशी त्याची किंमत आहे. रोमन डिझाइन असणारा 'ग्लॅडिएटर पेन' तसंच युरोपियन कलाकारांची सही असणाऱ्या एक लाख 41 हजार रुपये किमतीच्या पेनांनी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतलं. या महोत्सवात स्वामी दयानंद सरस्वती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम आणि पु. ल. देशपांडे यांची स्वाक्षरी असणारे पेनदेखील बघायला मिळाले.
हेही वाचा -