नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या रणदुमाळीची जोरदार तयारी दिल्लीत सुरू आहे. आम आदमी पार्टीनं दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या स्टार प्रचारकांच्या यादीत अरविंद केजरीवाल यांच्यासह दिल्ली आणि पंजाबमधील पक्षाच्या प्रमुख नेत्यांची नावं आहेत. दरम्यान आम आदमी पार्टीच्या बंडखोर नेत्या खासदार स्वाती मालीवाल यांचं नाव यादीत नाही. आम आदमी पार्टीनं जाहीर केलेल्या 40 प्रचारकांच्या यादीत पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचं पहिलं नाव आहे. सुनीता केजरीवाल यांचं नाव नवव्या क्रमांकावर आहे. निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश करणारे शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांचंही नाव या यादीत टाकण्यात आलं आहे.
आम आदमी पार्टीचे हे आहेत राजधानीत स्टार प्रचारक : आम आदमी पार्टीनं दिल्ली आणि पंजाबमधील अनेक मंत्री आणि खासदारांना दिल्लीच्या विधानसभा निवडणूक प्रचारात उतरवण्याचं जाहीर केलं आहे. या स्टार प्रचारकांची यादी पक्षानं निवडणूक आयोगाला पाठवली आहे. जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आणि त्यानंतर हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये आम आदमी पार्टीनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत हरभजन सिंगच्या नावाची बरीच चर्चा झाली. हरभजन सिंग आम आदमी पार्टीचा राज्यसभा खासदार असूनही निवडणूक प्रचारात दिसला नाही. मात्र दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये स्टार प्रचारकांच्या यादीत त्याचं नाव टाकण्यात आलं आहे. आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल मागील काही महिन्यांपासून एकाकी पडल्या आहेत. तत्कालीन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी गैरवर्तन आणि हाणामारीची घटना घडल्याचा त्यांनी आरोप केला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
या स्टार प्रचारकांचा आहे समावेश : आम आदमी पार्टीनं जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत पहिल्या पाच नावांमध्ये अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री आतिशी, भगवंत मान, सुनीता केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांचा समावेश आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन वर्षांपासून तिहार तुरुंगात असलेल्या सत्येंद्र जैन यांचं नाव या यादीत समाविष्ट असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडं लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचारापासून दूर असलेले खासदार राघव चढ्ढा यांचं नावही दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. त्यांच्यासह मंत्री सौरभ भारद्वाज, गोपाल राय, खासदार संदीप पाठक, पंकज गुप्ता आदींची नावं या यादीत आहेत.
कधी होणार दिल्लीत मतदान : दिल्लीतील 70 विधानसभा मतदारसंघात 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. तर मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केल्यानंतर दिल्लीत राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या रणधुमाळीत भाजपा आणि आपमध्येच खरी लढत होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा :