छत्रपती संभाजीनगर : राज्यातील खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये आपलं प्राविण्य दर्शवत आहेत. 'आईस स्टॉक' या खेळात महाराष्ट्राची मेधावी फुटाणे ही खेळाडू ऑस्ट्रिया इथं पार पाडणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. राज्यातील पहिली महिला खेळाडू होण्याचा मान तिला मिळाला आहे. 25 फेब्रुवारी पासून ऑस्ट्रिया इथल्या केफनबर्ग इथं होणाऱ्या जागतिक स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. देशातील 34 जणांचा संघ या स्पर्धेसाठी जाणार असून महाराष्ट्रातील नऊ खेळाडूंचा यात समावेश आहे.
दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग : 'आईस स्टॉक' हा तसा युरोपियन देशांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. मागील काही वर्षांपासून भारतात हा खेळ खेळला जात असून, देशातील अनेक खेळाडू परदेशात सफाईनं खेळत आहेत. जिल्ह्यातील खेळाडू प्रणव तारे यांनी याच महिन्यात इराण इथं झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकण्याची किमया केली. त्यांचीच शिष्य असलेल्या मेधावी हिनं सलग दोन वर्ष काश्मीरमधील गुलमर्ग इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. "2024 मध्ये दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई महाराष्ट्रासाठी केली होती. तर, यावर्षी झालेल्या स्पर्धेत एक रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई तिनं केली. त्या जोरावर जागतिक स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे." अशी माहिती प्रशिक्षक प्रणव तारे यांनी दिली. मेधावी सध्या गायकवाड ग्लोबल शाखेत नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे.
प्रशिक्षक प्रणव तारे यांची चमकदार कामगिरी : आशियाई 'आईस स्टॉक चॅम्पियनशिप स्पर्धे'त भारतीय आईस स्टॉक स्पोर्ट्स संघानं एक अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास रचला. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत १३ आशियाई देशांमधील अव्वल खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करताना प्रशिक्षक तथा खेळाडू प्रणव तारे यांनी अतुलनीय कौशल्य, रणनीती आणि दृढनिश्चय दाखवून आइस स्टॉक आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकलं. आइस स्टॉक स्पोर्टमध्ये भारतासाठी हे पहिलं आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकणारे मराठवाडा मधील पहिले खेळाडू ठरले.
असा असतो खेळ : 'आईस स्टॉक' हा खेळ युरोपियन देशांमध्ये बर्फावर खेळला जातो. मुख्यतः ऑस्ट्रिया, जर्मनी भागांतील शाळांमध्ये हा सक्तीचा खेळ आहे. वैयक्तिक आणि समूह अशा दोन पद्धतीनं हा खेळ खेळला जातो. एका लोखंडी प्लेटला छोट्या पद्धतीचा दांडा लावलेला स्टॉक असतो. बर्फावर एक लक्ष्य ठेवलं जातं. जवळपास आठ किलो वजनाचा हा स्टॉक त्या लक्ष्यावर सरपटत फेकावा लागता. लक्ष्याच्या ठिकाणी गोल आकाराला जातो. बर्फावर फेकलेल्या स्टॉकनं थेट लक्ष भेदलं तर, दहा गुण मिळतात. बाजूला असलेल्या गोलवर आल्यास 10,8, 6, 4 ,2 असे गुण दिले जातात. दिलेल्या फेऱ्यांमध्ये जो जास्त गुण मिळवेल तो विजेता ठरतो. असा बर्फाळ प्रदेशातील खेळ देशासह राज्यात खेळला जात आहे. याचीच जागतिक स्पर्धा ऑस्ट्रिया इथं पार पडत आहे.
स्थानिक पातळीवर सरावासाठी अडचणी : 'आईस स्टॉक' हा खेळ बर्फाळ भागात खेळला जातो, खेळाच्या सर्व स्पर्धा शीत प्रदेशात आयोजित केल्या जातात. अशा खेळाचा सराव करताना अनेक अडचणी स्थानिक पातळीवर येतात. देशात काश्मीर वगळता इतरत्र सराव करताना गुळगुळीत असलेले मैदान पाहावे लागते. तर, कधी सिमेंटनं गुळगुळीत असलेली जागा किंवा रस्ता पाहून सराव करावा लागतो. अशा ठिकाणी सराव करताना ताकद लावावी लागते. बर्फाळ प्रदेशात खेळताना कमी ताकदीनं आणि विशेष पद्धतीनं तो खेळावा लागतो. त्यामुळं बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं मेधावीनं सांगितला.
हेही वाचा :