मुंबई- राज्यातील महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतरही मंत्रिपदाच्या शपथविधीला विलंब झाला होता. त्यानंतर खातेवाटपही बारगळलं होतं. आता पालकमंत्रिपद जाहीर केल्यानंतर आपापसात धुसफूस सुरू झालीय. एका मंत्र्याने रायगड जिल्ह्यात रास्ता रोको केलाय आणि धमक्या दिल्यात, हे राज्यात काय चालले आहे, असा प्रश्न शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तुम्हाला मिळालेले बहुमत खरे नाही, बहुमताचा तुम्ही अनादर करत आहात, असे संजय राऊत म्हणालेत. कॅबिनेटमध्ये आपापसात त्यांच्या खून आणि मारामाऱ्या होण्याच्याच फक्त बाकी आहेत, मंत्र्यांमध्ये हाणामारी होण्याचे बाकी आहे, अशी टीका त्यांनी केलीय.
दरे हे एकनाथ शिंदेंचे दावोस : आमच्या ठाण्याचे उपमुख्यमंत्री राग आला की गावी जाऊन बसतात, हा महाराष्ट्र तुमच्या राग-लोभ-रुसवे-फुगव्यांप्रमाणे चालणार आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मिळालेल्या सत्तेचा वापर राज्याच्या हितासाठी करा, असे आवाहन त्यांनी केलंय. मात्र, विजयाच्या धक्क्यातून सरकार अद्याप सावरलेलं नाही. एवढा मोठा विजय पचवता येत नाही. दरे हे एकनाथ शिंदेंचे दावोस आहे, तिथे बसून ते पक्षात, राज्यात, कुटुंबात गुंतवणूक आणतात, असा टोलाही राऊतांनी लगावलाय. एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा आहेत. शिंदेंनी यावेळी महाकुंभ मेळाव्यात नागा साधूंसोबत जाऊन बसायला हवे होते, नागा साधू अस्वस्थ असतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील अस्वस्थ आत्म्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथे बनवलेल्या तंबूत राहावे, असा सल्लाही राऊतांनी शिंदेंना दिलाय.
आम्ही सर्वांना पुरून उरलोय : तुमच्या अस्वस्थपणामुळे राज्याला त्रास देऊ नका, तुमची अस्वस्थता राज्याच्या मुळावर येतेय, वारंवार नाराजीचे कारण कळायला पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले. काँग्रेस नेते म्हणतात, त्याप्रमाणे उद्धव ठाकरे संपलेले नाहीत, आम्ही सर्वांना पुरून उरलोय, आम्हाला संपलो म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांना तुम्ही कुठे आहात, असा प्रतिप्रश्नही राऊतांनी विचारलाय. शिवसेना संपली नाही आणि संपणार नाही, असंही राऊतांनी काँग्रेसला ठणकावलंय. पहाटेच्या शपथविधीबाबत धनंजय मुंडेंनी त्यावेळी ओरडून सांगितले, मग आता शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसताना तुम्ही कुठे गेलात, धनंजय मुंडेंना एवढी रहस्ये माहिती आहेत, तर संतोष देशमुख हत्या कोणी केली ते सांगा, असे आव्हान त्यांनी दिलंय. धनंजय मुंडेंमुळे बीड बदनाम झालंय. अजित पवारांना वाटते त्यांची प्रतिमा चांगली आहे, त्यांची प्रतिमा कशी आहे, हे देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार सांगितलंय, असा टोला त्यांनी लगावला.
सैफ अली खान प्रकरणी पोलिसांचा दावा राजकीय : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी बांगलादेशी असल्याचा पोलिसांचा दावा राजकीय आहे. खरेच बांगलादेशी मुंबईत घुसले असतील तर त्याला सर्वस्वी मोदी आणि अमित शाह यांचे सरकार जबाबदार आहे. एक बांगलादेशी चाकू घेतो आणि अत्यंत सुरक्षित असलेल्या सैफ अली खानच्या घरात हल्ला करतो, हे रहस्यमय आहे. तुम्ही काहीतरी लपवताय आणि त्याचे खापर दुसऱ्या कुणावर तरी फोडताय, असे टीकास्त्र राऊतांनी सोडले. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशीची हत्या बांगलादेशींनी केली आहे का हे सांगा, बांगलादेशींना भारतातून बाहेर काढायला हवे ते बरोबर आहे, मग सर्वप्रथम शेख हसीनांना भारताबाहेर काढा, असे आव्हान त्यांनी सरकारला दिलंय.
आतापर्यंत सैफ अली खान हा लव्ह जिहादचा प्रतीक : मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्यााठी बांगलादेशी ओरड केली जातेय. आम्ही सर्वप्रथम बांगलादेशी विरोधात मोहीम राबवली. आम्हाला विरोध करणारे, आम्हाला गप्प बसवणारे भाजपाचे सरकार होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण गुन्हे पत्रकार म्हणून पत्रकारितेला प्रारंभ केलाय. त्यामुळे मुंबईत पोलीस खात्यात काय चालतंय याचा अंदाज आहे. सैफ प्रकरणावरून राजकारण करण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत सैफ अली खान हा लव्ह जिहादचा प्रतीक होता. मात्र आज तुम्हाला पुळका आलाय, कसला आंतरराष्ट्रीय कट, अशी खिल्ली त्यांनी उडवली. राज्याचे आणि केंद्राचे गृहमंत्रालय अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केलाय.
हेही वाचा-