मुंबई- अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चाकूनं मारहाण करणाऱ्या बांगलादेशी आरोपींबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा इलेक्ट्रॉनिक्सि मीडियामधील बातम्यांच्या आधारे पोलिसांच्या तपासावर बारकाईनं लक्ष ठेवून होता. मीडियानं दाखवलेल्या संशयिताचे स्क्रीनशॉट काढून त्यानं मोबाईल फोनमध्ये ठेवले होते.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी अटक होत नसल्यानं पोलिसांवर दबाव वाढला होता. पोलिसांनी आरोपीला पकडण्याकरिता सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास सुरू केला होता. या संशयितांचे फोटो माध्यमांकडून दाखविण्यात आले होते. या आरोपीनं संशयितांचे बातम्यांमधील स्क्रीनशॉट काढले होते. विशेष म्हणजे संशयितांचे फोटो बऱ्याच प्रमाणात आरोपीशी जुळणारे होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी यापूर्वी दोन संशयितांना उचलून त्यांची चौकशी केली होती.
अभिनेत्याच्या घरात कसा शिरला? मुंबई पोलिसांमधील सूत्राच्या माहितीनुसार सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी गुन्ह्याचं नाट्यरुपांतरण (सीन रिक्रिएशन) करण्यात येणार आहे. शहजादला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांनी ठाणे शहरातून अटक केली. न्यायालयानं आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांमधील तपासानुसार आरोपी हा इमारतीच्या सातव्या-आठव्या मजल्यावरील पायऱ्या चढला होता. त्यानं डक्ट एरियामधून शिरत पाईपचा वापर करून १२ व्या मजल्यावर पोहोचला. बाथरुमच्या खिडकीतून अभिनेत्याच्या फ्लॅटमध्ये शिरला होता. आरोपीनं घरात शिरल्यानंतर ५४ वर्षीय अभिनेता सैफअली खानवर चाकुचे ६ वार केले होते. अभिनेत्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून काही दिवसांमध्ये डिस्चार्ज दिला जाणार आहे.
बांगलादेशला जाण्यासाठी सुरू होते प्रयत्न- पोलिसातील सूत्राच्या माहितीनुसार आरोपीननं सैफ अली खान राहत असलेली इमारत, शाहरुख खान राहत असलेली मन्नत आदी ठिकाणांची रेकी केली होती. मन्नतभोवती असलेल्या उंच भिंतीमुळे त्यानं घुसखोरी करण्याचा विचार सोडून दिला होता. शहजाद एक महिन्यापासून बेरोजगार असल्यामुळे बांगलादेशला परतण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यासाठी तो पैशांची जुळवाजुळव करत होता. पण, त्याला यश आलं नव्हते. एका रिक्षाचालकानं अभिनेता शाहरुख खान आणि सैफ अली खानचं घर दाखविल्यानंतर त्याला तिथे दरोडा टाकण्याची कल्पना सुचली होती. घरात शिरल्यानंतर आरोपीला घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरण्याची संधी मिळाली. मात्र, घरात पकडले जाण्याच्या भीतीनं त्यानं पळ काढला.
आरोपी बांगलादेशातील कुस्तीपटू- पोलिसामधील सूत्राच्या माहितीनुसार आरोपी बांगलादेशातील कुस्तीपटू आहे. त्यानं जिल्हा तसेच राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळली आहे. त्यामुळेच तो सैफ अली खानवर हल्ला करण्यात यशस्वी झाला. सैफवरील हल्ल्यानंतर त्यानं ३ ते ४ वेळा कपडे बदलले होते. गुन्हा केल्यानंतर आरोपी वांदे येथून दादर, वरळी, अंधेरी आणि त्यानंतर ठाणे येथे निघून गेला. गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, आरोपी शहजाद गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईत आला होता. आरोपीनं अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली आहे. आरोपी हा रिक्षाचालकाकडून सेलिब्रिटींच्या घरांची माहिती घेत असे.
हेही वाचा-