ठाणे Raj Thackeray Leg Injured : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी (11 सप्टेंबर) ठाणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते 15 गणेश मंडळांना भेट देणार होते. मात्र, यादरम्यान गाडीतून उतरताना त्यांच्या पायाला दुखापत झाल्यानं त्यांना दौरा थांबवावा लागलाय. शिवाई नगर, पातलीपाडा आणि बाळकुम तसंच वृंदावन सोसायटी या ठिकाणच्या गणेश मंडळांना भेटी दिल्यानंतर ते उथळसर येथे दर्शनाला जात असताना त्यांच्या गुडघ्याला मार लागला. त्यानंतर त्यांनी थेट शासकीय विश्रामगृह गाठलं. त्याच ठिकाणी डॉक्टरांनाही बोलावण्यात आलं. डॉक्टरांच्या पथकानं तपासणी केल्यानंतर राज ठाकरेंनी आपला पुढील दौरा रद्द केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण दौरा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनंही आता ठाण्यातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठीच राज ठाकरे हे बुधवारी ठाण्यात आले होते. ठाण्यात येऊन ते चारही विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायांचं दर्शन घेणार होते. संध्याकाळी राज ठाकरे ठाण्यात आल्यानंतर त्यांनी ठाणे विधानसभा आणि ओवळा-माजिवडा मतदार संघातील गणेश मंडळाना भेटी दिल्या. यामध्ये पातलीपाडा, बाळकूम आणि श्रीरंग सोसायटीमधील गणेश मंडळाना भेटी दिल्यानंतर उथळ सर इथं त्यांचा पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी आपला ताफा थेट शासकीय विश्रामगृहाच्या दिशेनं वळवला.