मुंबई : "देशातील संवैधानिक संस्थांना असलेला धोका लक्षात घेऊन त्या संस्था वाचवण्यासाठी देशपातळीवर विविध पक्षांनी एकत्रित येऊन 'इंडिया' आघाडी तयार कली आहे. संविधान व संविधानिक संस्थांसमोरील धोका अद्याप कायम आहे, त्याचप्रमाणं 'इंडिया' आघाडी देशपातळीवर पूर्ण ताकदीनं कार्यरत आहे. राज्य पातळीवर काही ठिकाणी वेगळी परिस्थिती असली, तरी देश पातळीवर 'इंडिया' आघाडी मजबूत आहे. ही आघाडी मजबूत राहील," असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन पायलट यांनी व्यक्त केला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानं काँग्रेसमध्ये नाराजी : "काँग्रेस आणि आप यांनी निवडणूक करार केला असता, तर चांगलं झालं असतं. दिल्ली विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. दोन्ही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मला वाटतं अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील 'आप' पक्ष मजबूत स्थितीत आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक 'आप' जिंकेल," असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. पक्षातून या वक्तव्याला विरोध झाल्यानंतर चव्हाणांनी सारवासारव करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा केला.
पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर थेट उत्तर टाळलं : सचिन पायलट यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाबाबत विचारल्यावर त्यांनी त्यावर थेट उत्तर देणं टाळलं. पृथ्वीराज चव्हाणांनी त्याबाबत केलेल्या खुलाशाकडं त्यांनी लक्ष वेधलं. "दिल्ली निवडणुकीसाठी 'इंडिया' आघाडीतील घटक पक्ष आप सोबत असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी जास्त बोलणं टाळलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेसनं आपला पाठिंबा दिला आहे. देशपातळीवर इंडिया आघाडी कमजोर झालेली नाही. 'इंडिया' आघाडीची साथ कुणी सोडलेली नाही," असा दावा त्यांनी केला. "दिल्लीत आम्ही स्वबळावर लढतोय, त्यामध्ये आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2025 या वर्षात काँग्रेस पक्ष संघटना अधिक सशक्त करण्यात येईल, 15 जानेवारीला काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन होईल," असं सचिन पायलट म्हणाले.
भाजपाला देशपातळीवर आव्हान : देशात अनेक पक्ष आहेत, त्यापैकी काही काँग्रेसचे समर्थक आहेत, तर काही काँग्रेसचे विरोधक आहेत. मात्र, भाजपाला राष्ट्रीय स्तरावर आव्हान देण्याची क्षमता काँग्रेसमध्येच आहे, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य नसीम खान, आमदार अमीन पटेल, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
भाजपाच्या कथनी आणि करणीत फरक : भाजपाच्या कथनी आणि करणीत फरक आहे. सरकारच्या योजनांमुळे देशातील गरीब आणि श्रीमंतांमध्ये मोठी दरी निर्माण होत आहे. सरकार केवळ धर्माच्या नावावर भेद करुन नागरिकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारनं आतापर्यंत ज्या घोषणा केल्या, त्यांची सद्यस्थिती काय आहे, हे समोर येण्याची गरज आहे, असे पायलट म्हणाले. देशातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक सुरक्षितता देण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा :