कोल्हापूर : 'दक्षिण काशी' अर्थात करवीर तीर्थाच्या भोवती चार वेगवेगळी शिवलिंग आहेत. याचा उल्लेख करवीर महात्म या ग्रंथात ही आढळतो. करवीर तीर्थात जितके पाण्याचे थेंब आहेत इतके शिवलिंग आहेत असा उल्लेख आढळतो. मुख्य चार दिशा आणि उपदिशांनाही शिवलिंग आहेत. महाशिवरात्रीला भाविकांकडून शिवलिंगाची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या निमित्तानं करवीर तीर्थाच्याभोवती असलेल्या चार शिवलिंगाचं महत्त्व जाणून घेऊया 'ईटीव्ही भारत'च्या या स्पेशल रिपोर्टमधून
कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात आढळतात पुराणकालीन शिवलिंग : भारतात उत्तर प्रदेशातील काशी महाराष्ट्रातील पैठण आणि करवीरनगरी अर्थात कोल्हापुरात पुराणकालीन शिवलिंग मोठ्या प्रमाणात आहेत. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई अंबाबाईच्या वास्तव्यानं पावन असलेल्या करवीर नगरीत अर्थात कोल्हापूरच्या चारी दिशांना 12 व्या शतकात नोंदली गेलेली चार शिवलिंग आहेत. करवीर नगराचं पूर्वद्वार असलेल्या आळते गावा जवळच्या डोंगरात रामलिंग नावाचं शिवलिंग आहे. तर, दक्षिणेला राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी टिटवे गावातही पुराणकालीन शिवलिंग आढळते. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या पश्चिमेला कळे गावाजवळ कलहेश शंकर आहे आणि गोटखिंडी गावाजवळ उत्तरद्वारेला गुप्त मल्लिकार्जुन शिवलिंगाची नोंद करवीर महात्म्य या ग्रंथात आढळते. "तीर्थक्षेत्रातील देवदैवतांच्या रक्षणासाठीच ही शिवलिंग स्थापित झाली आहेत." अशी माहिती करवीर महात्म्य ग्रंथाचे अभ्यासक उमाकांत रनिंगा यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
उपदिशांनाही होतं पुराणकालीन शिवलिंगाचं दर्शन : करवीर तीर्थाच्या मुख्य दिशांसह उपदिशांनाही पुराणकालीन शिवलिंग आढळतात. आग्नेय दिशेला खिद्रापुरात रुपेश शिवलिंग, नैऋत्य दिशेला सिद्ध संकेश्वर शिवलिंग आहे. यावरूनच संकेश्वर हे नाव प्रचलित झालं. तर, वायव्य दिशेला वाटेगावजवळ शिवलिंग आहे. ईशान्येला दिशेला हरिपुरा जवळ कृष्णा-वरून संगमावर संगमेश्वर शिवलिंग आढळते.
दैव-दैवतांच्या रक्षणासाठी शिवलिंग : "साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिराच्या शेजारी अनेक दैवदैवतांची मंदिरे आढळतात. 12 व्या शतकापासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुराणकालीन शिवलिंग पाहायला मिळतात. दैव-देवतांच्या रक्षणासाठी ही शिवलिंग स्थापित झालेली आहेत." अशी माहिती करवीर महात्म या ग्रंथात आढळत असल्याचं अभ्यासक उमाकांत रनिंग यांनी सांगितलं, महाशिवरात्रीच्या काकड आरतीला या सर्व मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
हेही वाचा :