ठाणे : एक हजार वर्षांपूर्वीपासून अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात महाशिवरात्री (Shiva Temple of Ambernath) उत्साहात साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शनासाठी येथे येतात. हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली. तसेच महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना अंबरनाथ शहरात बंदी घालण्यात आली आहे.
बंदोबस्ताचे ४ सेक्टर : अंबरनाथ शहरातील प्राचीन शिव मंदिरात ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरते. या एका दिवसात प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी जवळपास दोन ते अडीच लाख भाविक येतात. तर यात्रेमध्ये तब्बल ७ ते ८ लाख यात्रेकरू सहभागी होतात. या यात्रेच्या नियोजनासाठी शिवाजीनगर पोलिसांनी बंदोबस्ताची विभागणी करून विशेष बंदोबस्त लावला आहे. यामध्ये प्राचीन शिवमंदिर परिसर, मंदिराच्या बाहेरचा परिसर, यात्रा परिसर आणि स्वामी समर्थ चौक ते कैलास नगर असे बंदोबस्ताचे ४ सेक्टर असणार आहेत.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : या ४ सेक्टरमध्ये २ सहाय्यक पोलीस आयुक्त, ८ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २० सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २०० पुरुष पोलीस, ६० महिला पोलीस, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक, १५० होमगार्ड अशा तब्बल ३५० ते ४०० च्या जवळपास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याची माहिती, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली. तसेच त्यांनी मंदिरात दर्शन रांगेचा नवा रोडमॅप जाहीर केला आहे.
पुरातन मंदिराच्या यादीत शिव मंदिराची नोंद : महाशिवरात्रीला ठाणे, रायगड, मुंबई आणि उपनगरातून लाखोंच्या संख्येने भाविक या मंदिराला भेट देत शिवलिंगाचं दर्शन घेतात. जागतिक सांस्कृतीचा वारसा म्हणून ज्या २१८ कला संपन्न वास्तू युनोस्कोने जाहीर केल्या त्यात भारतातील अतीप्राचीन पुरातन मंदिराच्या यादीत या शिव मंदिराची नोंद आहे. शिलाहार राजा मुम्बानी यांच्या काळात इ.स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावरून आढळतो.
हेही वाचा -
- काय आहे महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त?; पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘या’ पाच गोष्टी दान करा
- 'या' प्राचीन मंदिरात शिवाजी महाराजांनी घेतलं होतं दर्शन, महाशिवरात्रीला रंगतो 'शिव पार्वती विवाह सोहळा'
- महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर राहणार 41 तास खुलं; अभिनेत्री प्राजक्ता माळी करणार शिवार्पणमस्तू नृत्य