नागपूर : मकरसंक्रांत जवळ येताचं प्रतिबंधित जीवघेण्या नायलॉन मांजाची छुप्या मार्गानं तस्करी सुरू झाली आहे. नागपुरात नायलॉन मांजाची छुप्या मार्गानं विक्री सुरू असल्यानं पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत नागपूर शहरातील तहसील पोलिसांनी दिल्ली इथून नागपूरला आलेला सहा लाखांचा मांजा जप्त केला आहे. पोलिसांनी नायलॉन मांजाच्या 600 चक्री जप्त केल्या आहेत.
कुख्यात आरोपीनं दिल्लीतून मागवला मांजा : पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी अमोल श्याम मोहंदेकर यानं दिल्ली इथून दहा बॉक्स नायलॉन मांजा मागवला होता, अशी गोपनीय माहिती पोलिसांना समजली. माहितीच्या आधारे तहसील पोलिसांनी एक पथक तयार करत सापळा रचला. आरोपी अमोल श्याम मोहंदेकर आणि त्याचा साथीदार वाहन चालकाला ताब्यात घेत 10 बॉक्स जप्त करण्यात आल्या. त्या बॉक्समध्ये 600 नायलॉन मांज्याच्या चक्री आढळून आल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नायलॉन मांजा बाळगणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल : या वर्षाच्या सुरुवातीपासूनचं नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजाची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांसह बाळगणाऱ्यावरही कारवाई करण्यास सुरुवात केली. त्या अंतर्गत 2 जानेवारी रोजी गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकानं शितल विनोद मानमोडे नामक 35 वर्षीय महिलेकडून नायलॉन मांजाच्या 16 चक्री जप्त केल्या. नायलॉन मांजा बाळगणं गुन्हा असल्यानं पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध कलम 223 भा.न्या.सं. सहकलम 5, 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम-1986, अन्वये पोलीस ठाणे शांतीनगर इथं गुन्हा दाखल करण्यात आला.
सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची कारवाई : दुसरी कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकानं केली. 2 जानेवारी रोजी गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हे पोलीस ठाणे पारडी हद्दीत पेट्रोलींग करत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दुचाकीवरुन जात असलेल्या दोन संशयित आरोपींना थांबवून त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांच्या जवळील बोरीत प्रतिबंधीत केलेल्या नायलॉन मांजाच्या एकूण 103 चक्री मिळून आल्या. पोलिसांनी रतन रामकिसन सिंग, कपिल कुलदीप सिंग विरोधात कलम 223 भा.न्या.सं. सहकलम 5, 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम-1986, अन्वये पोलीस ठाणे पारडी इथं गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ आवश्यक : नायलॉन मांजा हा केवळ पशू पक्षीच नाही, तर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठीही जीवघेणा ठरतोय. गेल्या काही वर्षांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी जीवघेण्या नायलॉन मांज्याच्या खरेदी-विक्रीवर प्रतिबंध घातलेला असला तरी छुप्या मार्गानं हा नायलॉन चायनीज मांजा सर्रासपणे विक्रीसाठी उपलब्ध होतो. पोलिसांकडून नायलॉन मांजाची खरेदी विक्री थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. आता सजग नागरिकांनी ही तत्काळ याबाबतची माहिती पोलिसांना देणं गरजेचं झालं आहे, असं मत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा :