नंदुरबार - जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न केले तर काय बदल होऊ शकतो, याचं उदाहरण समोर आलं आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा नंदुरबारमधील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी विविध विषयांमध्ये सरस ठरत आहेत.
जिल्हा परिषद बालआमराई येथील विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्वच विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहितात. हे आपण फक्त सिनेमांमध्ये किंवा कुठेतरी ऐकले असेल. मात्र, हे या विद्यार्थ्यांनी खरे करून दाखविलं आहे. या विद्यार्थ्यांना घडविण्यात येथील शिक्षकांचा मोलाचा वाटा उचलला आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या परिश्रमाचं आज फळ दिसून येत आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये 'गुणवत्तेची खाण'- बालआमराई गावाची लोकसंख्या 1000 पेक्षा कमी आहे. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी मराठी, इंग्रजी अथवा गणित विषय कोणताही असला तरी दोन्ही हातांनी लिहितात. एकाचवेळी दोन्ही हातांनी गिरवून फळ्यावरदेखील सुंदर असे मोत्यासारखे अक्षर काढतात. येथील विद्यार्थ्यांना पाढे म्हणायला लावले तर एकमेकांमध्ये स्पर्धा करतात. म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द तोंडपाठ असून चालीवर म्हणतात, हे विशेष! विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे वाचनदेखील अस्खलित आणि स्पष्ट आहे. एखाद्या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे आदिवासी विद्यार्थी एवढे हुशार असतील, याची कल्पनाही कोणीही आजवर केली नव्हती. कमालीचा आत्मविश्वास, कार्यानुभवाच्या माध्यमातून विविध वस्तू बनविण्याचं यांना धडे मिळवित आहेत.
आदिवासी बहुल जिल्ह्यात सकारात्मक बदल- नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल आहे. बहुतांश वेळा जिल्ह्यातील शिक्षणाच्या दर्जावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. शैक्षणिक दर्जाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर नंदुरबार तालुक्यातील बालआमराई येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी चांगलंचं उत्तर शोधलं आहे. या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्वच विद्यार्थी चक्क दोन्ही हातांनी पाढे, बाराखडी, इंग्रजी, मराठी शब्द लिहितात. या शाळेत विद्यार्थ्यांची ३० पटसंख्या आहे. पहिली ते चौथीच्या चार वर्गांसाठी दोन शिक्षक आहेत.
भविष्यात शिक्षण विभागाकडून या कार्याचा आणि गुणवत्ता वाढविण्याच्या प्रयत्नाचे नक्कीच फळ मिळेल. इतर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढेल. जिल्हा परिषदेतील विद्यार्थी घडविण्यात शिक्षण विभाग यशस्वी होईल- देवराम पाटील, प्राथमिक शाळा शिक्षक
येथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशामुळे चर्चेत? जिल्हा परिषद बालआमराई येथील विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांनाही लाजवतील, असे इंग्रजीचे वाचन करतात. गणितातील ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ आणि अचूक म्हणतात. उलटी उजळणी करण्यात इथले चिमुकल्यांचा झालेला सरावदेखील लक्ष वेधून घेतो. यामुळेच ही शाळा अनोखी ठरत आहे. इंग्रजी शाळांमधील पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची धडपड सुरू असते. मात्र, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दर्जा वाढविण्यासाठी येथील शिक्षकांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत जिल्हा परिषदेतील शाळादेखील सरस असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळेच गावातील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या हौशीनं आणि आनंदानं विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेण्यासाठी पाठवितात. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणारे प्रयत्न पाहून त्यांचा आदर करतात.
दोन्ही हातांनी लिहिण्याचं कौशल्य कसे शिकविले? शिक्षक देवराम पाटील म्हणाले, "थ्री इडियट चित्रपटामध्ये दोन्ही हातांनी लिहिणारा प्राध्याक दाखविण्यात आलेला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला त्याप्रमाणं दोन्ही हातांनी लिहण्याकरिता जमेल का? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला. त्यावर विद्यार्थ्यांना दोन्ही हातानं लिहिण्यास कशी मदत होईल, याबाबत पाऊल उचलले. त्यात यश मिळाले. विद्यार्थ्यांकडून वारंवार दोन्ही हातानं लिहिण्यासाठी सराव करून घेतला. त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच पालकांना याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांमधील विकसित गुण समोर आणले आहेत".
पालकांकडून मिळतेय सहकार्य- शाळेचे शिक्षक देवराम पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याबाबत सांगितलं, " भविष्यात विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी जाणवल्यास ते दोन्ही हातांचा वापर करून लिहू शकतात. यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना दोन्ही हातांनी लिहिण्यासाठी पारंगत करत आहोत. विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहिताना विचारलेल्या एखाद्या प्रश्नांची उत्तरेदेखील देतील, याचा सराव करुन घेत आहोत. सर्व आदिवासी विद्यार्थी असले तरी विद्यार्थी शिकले पाहिजे, यासाठी पालकांकडून आम्हाला मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळत आहे. आम्ही दिलेला अभ्यास कसा पूर्ण करता येईल. यासाठी आम्ही पालकांशी संवाद करीत असतो. त्यांना याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो".
हेही वाचा-