विदिशा : मध्य प्रदेशातील विदिशामधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या चुलत बहिणीच्या लग्नाला आलेली एक तरुणी संगीत कार्यक्रमात नाचत असताना अचानक स्टेजवर कोसळली. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार तिला हृदयविकाराचा झटका आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
लग्नातील आनंदावर क्षणात विरजण - खरंतर, इंदूरची २५ वर्षांची परिणीता जैन तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी विदिशा येथे आली होती. लग्न शहरातील एका रिसॉर्टमध्ये होतं. तिथे संगीत कार्यक्रमाकरता नृत्यासाठी एक स्टेज तयार करण्यात आलं होतं. परिणीता नाचण्यासाठी स्टेजवर पोहोचली, ती फक्त २ मिनिटे नाचली आणि अचानक स्टेजवर कोसळली. काही वेळ काहीच हालचाल न झाल्यानं कुटुंबीयांनी मुलीला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेलं. तिथं डॉक्टरांच्या टीमनं या मुलीला वाचवण्यासाठी तासभर प्रयत्न केले, पण ती वाचू शकली नाही.
यापूर्वीच्या अशा घटना
- पशुपतिनाथ मंदिरात एका वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला, तो पडला आणि पुन्हा उठू शकला नाही.
- शर्यतीच्या स्पर्धेत धावताना अचानक पडून हृदयविकाराच्या झटक्याने १२ वर्षांचा विद्यार्थी मृत्युमुखी पडला.
हल्ली हृदयविकाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. रुग्णालयातील डॉक्टर गजेंद्र रघुवंशी म्हणाले, "शनिवारी रात्री १०:३० वाजता, २५ वर्षीय मुलीला तिच्या कुटुंबीयांनी बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणलं. ८ डॉक्टरांच्या पथकानं मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला वाचवता आलं नाही. प्रथमदर्शनी, मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं दिसतं."
गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते, अचानक वाढलेली शारीरिक हालचाल, ताणतणाव आणि हृदयाशी संबंधित समस्या अशा घटनांना कारणीभूत ठरू शकतात. मात्र, या प्रकरणात मृत्यूचं खरं कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल.
हेही वाचा....